संतोष ट्रॉफीत केरळ चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:44 AM2018-04-02T01:44:59+5:302018-04-02T01:44:59+5:30
गोलरक्षक मिधुन व्ही. याच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर केरळने आज येथे संतोष ट्रॉफीच्या ७२ व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गत चॅम्पियन बंगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले.
कोलकाता - गोलरक्षक मिधुन व्ही. याच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर केरळने आज येथे संतोष ट्रॉफीच्या ७२ व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गत चॅम्पियन बंगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले.
निर्धारित व अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते आणि त्यानंतर निकालासाठी शूटआऊटची मदत घ्यावी लागली. संतोष ट्रॉफीत केरळने १३ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावले. त्यांचे हे एकूण या स्पर्धेतील सहावे विजेतेपद आहे. या रोमहर्षक लढतीत निर्धारित ९0 मिनिटांनंतर सामना १-१ असा बरोबरीत राहिला. ३0 मिनिटांच्या अतिरिक्त खेळानंतर सामना २-२ गोलने बरोबरीत सुटला. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर (सॉल्टलेक स्टेडियम) खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या १९ व्या मिनिटाला जितीन एम. एस.ने गोल करीत केरळला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात केरळने आघाडी कायम ठेवली.
६८ व्या मिनिटाला जितेन मुर्मू याने गोल करीत बंगालला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्धारित वेळेत दोन्ही प्रतिस्पर्धी संघ गोल करू शकले नाहीत. त्यामुळे हा सामना अतिरिक्त वेळेत खेचला गेला. यावेळी, केरळच्या विबिन थॉमस आणि बंगालच्या तीर्थंकर सरकारने प्रत्येकी एक गोल करीत ही लढत २-२ पेनल्टी शूटआऊटमध्ये नेली.
मिधुन ठरला शिल्पकार
शूटआऊटमध्ये मिधुन हा केरळच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने बंगालच्या अंकित मुखर्जी आणि नबी हुसैन यांचे पहिले दोन पेनल्टी शॉट यशस्वीपणे रोखले. त्यानंतर सरकार व संचयन समाद्दरने गोल केले जे की, बंगालसाठी पुरेसे नव्हते. केरळच्या खेळाडूंनी सुरुवातीच्या चारही पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. हे गोल व्ही. राज, जितीन गोपालन, जस्टिन जॉर्ज व सीसान एस. यांनी केले.