कोची : फुटबॉलच्या वेडापायी कोण काय करेल याचा नेम नाही... आतापर्यंत फुटबॉलसाठी अनेकांनी परीक्षा बुडवणारे, कौटुंबीक कार्यक्रम, महत्त्वाची मिटींग विसरणारे पाहिले होते. मात्र, आज एक असा किस्सा घडला आणि जगाच्या पाठीवर असा फुटबॉलप्रेमी शोधून सापडणार नाही. केरळच्या रिदवाननं असं काही केलं की त्याच्या या वेडेपणावर हसावे की रागवावे हेच कळेनासे झाले आहे.
केरळ येथे होणाऱ्या मल्लपुरन 7-a-side फुटबॉल स्पर्धेतील फिफा मंजेरी या संघातीत रिदवान हा प्रमुख खेळाडू... मात्र, फिफा मंजेरी संघाच्या या बचावपटूसमोर मोठा पेच निर्माण झाला. संघाची अंतिम लढत आणि त्याच्या लग्नाची तारीख एकाच दिवशी आल्याने त्याच्यासमोर यक्षप्रश्नच निर्माण झाला. त्याला फुटबॉल किंवा लग्न यापैकी एकाचीच निवड करायची होती आणि मंजेरी संघाला त्याची अत्यंत गरज होती.
कोणाच्याही आयुष्यात हा प्रसंग आला तर तो नक्कीच फुटबॉलला दुय्यम प्राधान्य देईल. मात्र, या पठ्ठ्याने लग्नाच्या दिवशी होणाऱ्या नवरीकडे फुटबॉल मॅच खेळण्यासाठी पाच मिनिटे मागून मैदानावर धाव घेतली. नशीबाने तो परत आला तो जेतेपदाचा चषक उंचावूनच. पण, त्याच्या या कृत्याने नवरीकडच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड नाराज झाले होते. एका सामन्यासाठी रिदवानने केलेले कृत्य पाहून नवरीनेही आश्चर्य व्यक्त केले. जर ही मॅच सायंकाळी असती, तर तु लग्न रद्दही केले असते का, असा सवाल होणाऱ्या नवरीने केला. रिदवानच्या या फुटबॉलप्रेमाची दखल केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही घेतली आणि त्यांनी रिदवानची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.