- सचिन भोसले
कोल्हापूर : राज्य शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलपटू काही केल्या पात्रतेच्या निकषांत यंदाही बसले नाहीत. त्यामुळे २० वर्षांपासून सुरू असलेला पुरस्कारापर्यंतचा प्रवास काही केल्या संपेनासा झाला आहे. राज्य शासनाने पुरस्काराबाबतचे निकष बदलावेत, अशी मागणी फुटबॉल जाणकारांकडून होत आहे.
राज्य शासनातर्फे दरवर्षी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, मार्गदर्शकांना हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. ‘फुटबॉल’ या खेळात खेळाडूंना संतोष ट्रॉफीसारख्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य अशी पदके सलग चार वर्षे मिळवावी लागतील अथवा आंतरराष्ट्रीय वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, तरच हा पुरस्कार मिळेल, असा निकष आहे. संघटक-कार्यकर्त्यांना हा पुरस्कार हवा असल्यास देशभरात सातत्याने सराव शिबिर, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे दौरे आयोजित केले पाहिजेत. त्यांचे प्रशिक्षकपद भूषविले पाहिजे. राष्ट्रीय स्पर्धाही भरविल्या पाहिजेत; तरच हा पुरस्कार त्यांना मिळेल. प्रशिक्षकांनी तर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले पाहिजेत, असे निकष आहेत. एकूणच पुरस्कार छाननी समिती निकषानुसार हा पुरस्कार फुटबॉलपटूंना मिळणे कठीण दिसते. त्यामुळे राज्य शासनाने निकष बदलले तरच फुटबॉलपटूंना पुढील वर्षी ‘शिवछत्रपती’ पुरस्कार मिळेल.
पुरस्कार सुरू झाल्यापासून १९९० ला महाराष्ट्र संघाने केरळवर १-० ने मात केली. या संघात गॉडश्री परेरा, अखिल अन्सारी यांना खेळाडू म्हणून, तर प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू डेरिक डिसूझा (पूर्वीचा दादोजी कोंडदेव पुरस्कार) आणि कार्यकर्ता-संघटक म्हणून शिवाजी पाटील यांना १९९७ साली पुरस्कार मिळाला आहे.फुटबॉल खेळासाठी बदलले निकषजलतरण, हॉकी, नेमबाजी, कुस्ती, वेट लिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, खो-खो, मल्लखांब यांतील खेळाडू व संघटकांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते.विशेषत: कुस्ती, नेमबाजी या खेळांना पुरस्कारात झुकते माप दिले जाते. मात्र, फुटबॉलसाठी वेगळे निकष लावल्याने या खेळात सरकारच्या निकषांत बसणारे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक मिळणे कठीण आहे.
पुरस्कारातील कोटा पद्धत बंद करावी, यासह महाराष्ट्रातील खेळाडूंची किमान दोन महिन्यांची लीग सुरू करावी. त्यातून खेळाडूंची निवड करावी. मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ता, आदींबाबत निकष बदलण्याबाबत विचार करावा.- शिवाजी पाटील, शिवछत्रपतीपुरस्कार विजेते