लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव देशातील नामांकित क्लब इस्ट बंगाल संघाशी दोन वर्षांकरीता २ कोटी ३५ लाख रूपयांच्या मोबदल्यावर करारबद्ध झाला. इतके मोठे मानधन घेणारा तो पश्चिम महाराष्ट्रातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. शाहूपुरी सहाव्या गल्लीत राहणाऱ्या अनिकेत ने २०१७ साली सतरा वर्षाखालील युवा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर त्याचा खेळ बहरत गेला. त्याला भारतीय फुटबाॅल महासंघाने आपल्या ॲरोज या संघासाठी प्रति महिना ५० हजार रूपये मानधनावर करारबद्ध केले. त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही.
त्याला त्याच्या स्ट्रायकर च्या खेळीने देशातील नामांकीत फुटबॉल संघ जमशेदपुर एफसी ने दोन वर्षांकरीता ९० लाख रूपयांकरीता करारबद्ध केले. या संघातील कामगिरीवर त्याची जर्मनीच्या जगप्रसिद्ध ब्लॅक बर्न रोव्हर्स या संघात खास प्रशिक्षणासाठी निवड झाली. येथे त्याला जगभरातील नामांकीत फुटबॉलपटूंसोबत सराव आणि सामने खेळता आले. याच प्रशिक्षणाच्या जोरावर त्याची यानंतर हैदराबाद एफसी फुटबॉल संघात स्ट्रायकर म्हणून निवड झाली. येथे तो तीन वर्षांकरीता सव्वा कोटी रुपये मानधनाचा करारबद्ध झाला.
दरम्यान त्याची एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीचे सामन्यांच्या तयारीसाठी भारतीय फुटबॉल संघ बहरिन व बेलारूस येथे दोन मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी निवड झाली. त्याने आघाडीचा खेळाडू म्हणून आयएसएल लीग स्पर्धेत मोठा दबदबा निर्माण केला आहे. याच खेळीच्या जोरावर त्याला इस्ट बंगाल क्लबने दोन वर्षांकरीता २ कोटी ३५ लाख रूपये इतक्या मोठ्या मानधनावर करारबद्ध केले. या संघाच्या व्यवस्थापनाने अनिकेतचा हैदराबाद एफसी फुटबॉलसंघाशी करार अजूनही एक वर्षे शिल्लक असताना त्याला करारबद्ध केले आहे. त्याकरीता या इस्ट बंगालने हैदराबाद संघ व्यवस्थापनाला करार संपुष्टात आणण्यासाठी १० लाख रूपयांचा दंडही भरला आहे. ही करारबद्ध होण्याची प्रक्रीया गेली दोन दिवस सुरु आहे. यापुढे अनिकेत कोलकत्ताच्या फुटबॉल जगतात पुढील दोन वर्षे खेळणार आहे.
व्यावसायिक स्पर्धेतील माझी खेळी पाहून ईस्ट बंगाल संघाने मला माझा आदीच्या संघाशी करार असतानाही खेळण्याची ऑफर दिली. त्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रीय लवकरच पुर्ण होईल. मी आणखी चांगला खेळ करून कोल्हापूरचे नाव आणखी मोठे करीन, असे अनिकेत जाधव म्हणाला.