कझान - विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीच्या महत्वाच्या लढतीत जर्मनीचा संघ प्रचंड दबावाखाली खेळला. स्वीडनविरुद्धच्या विजयी संघातील ५ खेळाडूंना बसवण्याचा निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता. पण त्याचा फार फरक त्यांच्या खेळावर झाला नाही. दक्षिण कोरियाने गतविजेत्यांना जखडून ठेवले. आक्रमण सुरुवात करताना कोरियन खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचे प्रयत्न केले. कोरियाला यश मिळाले नाही आणि जर्मनीला पहिल्या सत्रात सामना गोलशून्य राखता आला.
जर्मनीने चेंडूवर अधिक काळ ताबा राखला परंतु त्यावर गोल कराण्याच्या संधी निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. काही सोप्या संधीही त्यांनी गमवल्या. निक्लास स्युले आणि लिओन गोरेत्झका यांनी जर्मनीकडून या लढतीत पदार्पण केले. पण त्यांनाही छाप पाडता आली नाही. जर्मनीने सर्वाधिक काळ ( ७१%) चेंडूवर ताबा ठेवला होता. मात्र आक्रमणातील ढिसाळ खेळामुळे प्रशिक्षक जोकिम लो यांची चिंता वाढवली. सहा प्रयत्न करूनही जर्मनीला गोल करण्यात अपयश आले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीला एकदाही पहिल्या सत्रात आघाडी मिळवता आलेली नाही. याआधी १९८६ च्या स्पर्धे त्यांना हे अपयश आले होते. पहिल्या ४५ मिनिटांत कोरियाचा खेळ वरचढ ठरला.