माद्रिद : चॅम्पियन लिगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व अकरा खेळाडूंना विश्रांती देण्याचा फटका शनिवारी बार्सिलोनाला बसला. ला लिगा स्पर्धेत बार्सिलोनाला सेल्टा व्हिगोकडून ०-२ ने पराभूत व्हावे लागले.बार्सिलोनाने लियोनल मेस्सी, लुई सुआरेज, फिलिप कुटिन्हो या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. सामन्यादरम्यान पहिल्या हाफमध्येच ओसमाने डेम्बले याला दुखापत झाल्याने तोही मैदानाबाहेर पडला.उरुग्वेचा आघाडीपटू मॅक्सी गोमेज याने सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ८८ व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या वेग्यूने चेंडू हाताळल्याने पंचांनी सेल्टाला पेनल्टी बहाल केली. अस्पासने यावर अलगद गोल करत संघाला २-० असा विजय मिळवून दिला. या पराभवाचा बार्सिलोनावर काही फरक पडणार नाही. बार्सिलोनाने मागील आठवड्यातच ला लिगाचे २६ वे जेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे सेल्टाला मात्र पाच गुणांचा फायदा झाला असून त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. डेम्बलेची दुखापत चॅम्पियन चषक स्पर्धेत मंगळवारी लिव्हरपूलविरुद्ध होणाºया सामन्यापुर्वी बरी होण्याची शक्यता कमीच आहे.
ला लिगा फुटबॉल : बार्सिलोना सेल्टा व्हिगोकडून पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 3:08 AM