बार्सिलोना : स्टार गेराथ बेले याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी एफसी बार्सिलोनाला २-२ असे रोखले. या सामन्यात सर्वांचे लक्ष मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर लागले होते. दोघांनीही प्रत्येकी एक गोल नोंदवत अपेक्षित कामगिरी केली. मात्र गेराथचा गोल निर्णायक ठरल्याने त्याचीच चर्चा सर्वाधिक रंगली.कॅम्प नाऊ येथे झालेल्या या रोमांचक सामन्यात लुईस सुआरेज याने दहाव्याच मिनिटाला गोल करीत बार्सिलोनाला सुरुवातीलाच आघाडीवर नेले. बार्सिलोना या जोरावर वर्चस्व गाजवणार असे दिसत असतानाच, चार मिनिटांनी रोनाल्डोने आपला जलवा दाखवत अप्रतिम गोल करून रेयाल माद्रिदला १-१ असे बरोबरीत आणले. मध्यांतराला दोन्ही संघांनी बरोबरी कायम राखली होती. दरम्यान, मध्यांतराच्या आधी सर्गेई रोबर्टो याची माद्रिदच्या खेळाडूंसह बाचाबाची झाल्याने पंचांनी त्याला लाल कार्ड दाखवले. यामुळे बार्सिलोनाला दहा खेळाडूंनिशी उर्वरित सामन्यात खेळावे लागले.दुसऱ्या सत्रात अडचणीत आलेल्या बार्सिलोनाने भक्कम बचाव करताना माद्रिदचे आक्रमण रोखण्यात यश मिळवले. ५२व्या मिनिटाला मेस्सीने वेगवान गोल करत बार्सिलोनाला आघाडीवर नेले. मात्र, ७२व्या मिनिटाला गेराथ बेलेने निर्णायक गोल करत रेयाल माद्रिदला बरोबरीवर आणले. अखेरच्या मिनिटापर्यंत २-२ ही बरोबरी कायम राखत दोन्ही संघांनी कोणताही धोका पत्करला नाही. यासह बार्सिलोनाने ला लीगा स्पर्धेतील आपली अपराजित मालिका कायम राखण्यात यश मिळवले.या सामन्यात माद्रिदचा स्टार आणि हुकमी एक्का रोनाल्डोच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले. यामुळे त्याला मध्यांतरानंतर मैदानाबाहेर बसावे लागले. दरम्यान, आगामी २६ मे रोजी होणाºया लिव्हरपूलविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आशा रेयाल माद्रिदला आहे. (वृत्तसंस्था)
ला लीगा : हायव्होल्टेज सामना बरोबरीत सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:43 AM