माद्रिद : रियाल माद्रिदने ला लिगा फुटबॉल लीगच्या रविवारी झालेल्या सामन्यात इबारचा ३-१ ने पराभव करीत बार्सिलोनासोबतच जेतेपदाची दावेदारी कायम राखली आहे. क्लबचे कोच फ्रान्सचे माजी खेळाडू झिनेदिन झिदाने यांचा हा २०० वा सामना होता.टोनी क्रूझ याने चौथ्या आणि सर्जिया रामोसने ३० व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली होती. ३७ व्या मिनिटाला ब्राझीलचा खेळाडू मार्सेलो याने संघासाठी तिसरा गोल नोंदविल्यानंतर मैदानावर गुडघे टेकवून वर्णद्वेषाविरुद्धचा विरोध जाहीर केला. पराभूत इबोरकडून एकमेव गोल पेड्रो बिगास याने ६० व्या मिनिटाला केला. सहा हजार क्षमता असलेल्या स्थानिक क्लब मैदानावर हा सामना झाला. येथे एकही प्रेक्षक नव्हता. विजयानंतर झिदाने यांनी, ‘हा पूर्णपणे वेगळा अनुभव असल्याची प्रतिक्रिया दिली.’ झिदाने कोच असताना संघाचा हा ९० वा विजय आहे. या विजयानंतर रियाल माद्रिद संघ बार्सिलोनाच्या तुलनेत दोन गुणांनी मागे आहे.(वृत्तसंस्था)
ला लिगा: रियाल माद्रिदचे दमदार पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 1:30 AM