कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण जग एकजुटीनं काम करताना पाहायला मिळत आहे. चीनच्या वुहान शहरातून आलेला हा व्हायरस हा आतापर्यंत जगभरात पसरला आहे आणि त्याची सर्वाधिक झळ ही इटलीला सोसावी लागली आहे. आतापर्यंत जगभरात 4, 22,829 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 18, 907 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, एक लाखाहून अधिक लोकंही बरी झाली आहेत. त्यामुळे योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास या आजारावर मात केली जाऊ शकते, हे सिद्ध होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी आता जगातील दोन अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो धावले आहेत. त्यांच्यासह बार्सिलोना क्लबचे माजी प्रशिक्षक पेप गॉर्डिया आणि रोनाल्डोचा मॅनेजर जॉर्ज मेंडेस यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
बार्सिलोना क्लबचा सुपरस्टार मेस्सी आणि मँचेस्टर सिटी क्लबचे सध्याचे प्रशिक्षक गॉर्डिया यांनी बार्सिलोना येथील हॉस्पिटल्सना प्रत्येकी 1 मीलियन युरो म्हणजेच 8 कोटी रक्कम मदत म्हणून दिली आहे. ही मदत कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या सार्वजनिक रुग्णालयांना देण्यात येणार आहे. जेणेकरून उपचारांसाठी निधी कमी पडू नये. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. स्पेनमध्ये आतापर्यंत 1000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 25 हजाराच्या वर गेली आहे.
हॉस्पिटल क्लिनिक हे बार्सिलोनातील सार्वजनिक हॉस्पिटल आहे आणि मेस्सीनं त्यांना 8 कोटी रुपये दिल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. गॉर्डिया यांनीही औषधं आणि साहित्य खरेदी करण्यासाठी 8 कोटींची मदत केल्याचेही त्यांनी मान्य केले. हॉस्पिटल क्लिनिककडून या मदतीचे स्वागत करण्यात आले आणि या निधीचा योग्य तो वापर केला जाईल, अस आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही पुढाकारमेस्सीचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॅनेजर मेंडेस यांनी पोर्तुगालमधील लिस्बन आणि पोर्तो येथील हॉस्पिटल्सना प्रत्येकी 8 कोटी रुपयांची मदत केली आहे. पोर्तुगालमध्ये 2300 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे.