माद्रिद: अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही. मेस्सी २००६नंतर प्रथमच या पुरस्काराच्या अव्वल तीन नामांकनात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. मेस्सी चाहत्यांमध्ये या निर्णयावर प्रचंड नाराजी पसरली आहे.
या पुरस्कारासाठी ख्रिस्तीयानो रोनाल्डो ( पोर्तुगाल व युव्हेंटस), ल्युका मॉड्रीच ( क्रोएशिया व रेयाल माद्रिद) आणि मोहम्मद सलाह ( इजिप्त व लिव्हरपूल) यांच्यात चुरस रंगणार आहे. युरोपियन महासंघाच्या सर्वोत्तम युरोपियन खेळाडूचा पुरस्कार मॉड्रीचने पटकावला होता. त्याही पुरस्कारासाठी मेस्सीला अव्वल तिंघात स्थान मिळाले नव्हते. रोनाल्डो, मॉड्रीच आणि सलाह यांच्यातील चढाओढीत क्रोएशियाच्या कर्णधाराने बाजी मारली होती. मॉड्रीच आणि सलाह यांना प्रथमच या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. क्रोएशियाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणाऱ्या मॉड्रीचला गोल्डन बुट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय त्याने युरोपातील सर्वोत्तम खेळाडूचा मानही पटकावला. त्यामुळे फिफाच्या या पुरस्कारासाठी त्याचे पारडे जड मानले जात आहे. सर्वोत्तम खेळाडूंच्या अव्वल दहा नामांकनात मेस्सीसह केव्हीन डी ब्रुयने, राफेल व्हॅरने, अँटोनिए ग्रिझमन, ईडन हॅझार्ड, हॅरी केन आणि कायलिय मॅबाप्पे यांचा समावेश होता. मेस्सीने 2017-18च्या हंगामात 44 गोल करताना बार्सिलोना क्लबला ला लिगा आणि कोपा डेल रे स्पर्धेचे जेतेपद जिंकून दिले होते. मात्र, विश्वचषक स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. फिफा पुरस्कार विजेत्यांची घोषणा 24 सप्टेंबरला लंडन येथे केली जाणार आहे.