अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला अन् लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. मेस्सीने २०२२ च्या फिफा वर्ल्ड कप विजयानंतर आंतरराष्ट्रीय कर्तव्यातून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले. अर्जेंटिनाने पेनल्टी शूट आऊटवर फ्रान्सवर ४-२ ( ३-३) असा विजय मिळवला आणि मेस्सीने कारकिर्दीत प्रथमच वर्ल्ड कप जिंकला.
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कदाचितच अंतिम सामना एवढा थरारक झाला असेल. ८०व्या मिनिटाला २- ० अशी आघाडी घेणाऱ्या अर्जेंटिनाला गतविजेत्या फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेले... कायलिन एमबाप्पेने १ मिनिट ३७ सेकंदात दोन गोल केले अन् ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशी बरोबरी राहिली. ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात मेस्सीने १०८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, पण एमबाप्पे हार मानणारा नव्हता त्याने ११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली आणि सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला.
मेस्सीचे वर्ल्ड कप सेलिब्रेशन! आईला मिठी मारून लहान मुलासारखा रडला, पत्नी व मुलांसमोर भावनिक झाला
पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या मेस्सी, डिबाला, लिएंड्रो पेडेरेस व गोंझालो मॉटेई यांनी गोले केले. फ्रान्सकडून एमबाप्पे व रँडल कोलो मौनी यांना गोल करता आले, तर किंग्स्ली कोमन व आरेलोना टी चौमेनी यांनी संधी गमावली.
मेस्सीची ही पाचवी वर्ल्ड कप स्पर्धा होती आणि त्याची ही शेवटची स्पर्धा असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मेस्सीनेही फायनलपूर्वी हा शेवटचा वर्ल्ड कप सामना असल्याचे सांगितले होते, परंतु वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या सुपरस्टारने अजूनही आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्याची इच्छा असल्यचे स्पष्ट केले. त्याला वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग असलेली राष्ट्रीय संघाची जर्सी पुन्हा घालायची आहे.
मेस्सीने मोठे पारितोषिक जिंकल्याबद्दल त्याच्या आनंदाबद्दल सांगितले आणि ते साध्य करणे हे त्याचे मोठे स्वप्न असल्याचे सांगितले. मेस्सीच्या दिग्गज कारकिर्दीतील वर्ल्ड कप ही एकमेव गोष्ट होती ज्याने त्याला अनेक ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नव्हती, परंतु आता तिही त्याच्या ट्रॉफीच्या कपाटात आली आहे. "हे अविश्वसनीय आहे. मला माहित होते की देव मला चषक देणार आहे, मला खात्री होती. आमच्यासाठी हा एक मोठा आनंद होता. माझे हे खूप मोठे स्वप्न होते, मला माझे करिअर वर्ल्ड कपसह पूर्ण करायचे होते आणि मी करू शकतो. यापेक्षा जास्त विचारू नका,” ऐतिहासिक विजयानंतर मेस्सी म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"