Fifa World Cup Semi Final 2022, Argentina vs Croatia : लिओनेल मेस्सीच्याअर्जेंटिना संघाने बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेत क्रोएशियावर ३-० असा विजय मिळवून फायनलमध्ये धडक दिली. २२ वर्षीय ज्युलियन अलव्हारेजने दोन गोल केले, तर मेस्सीने पेनल्टीवर एक गोल करून विजयात हातभार लावला. अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे, १९३०, १९९० व २०१४ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अर्जेंटिनाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर भावनिक झालेल्या मेस्सीने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना धक्का बसला...
Fifa World Cup Semi finals: अर्जेंटिना फायनलमध्ये! लिओनेल मेस्सीचे 'स्वप्नपूर्ती'च्या दिशेने पाऊल
लिओनेल मेस्सी आज वर्ल्ड कप स्पर्धेतील २५ वा सामना खेळला.. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जर्मनीच्या लॉथर माथॉस यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. अर्जेंटिनाने सहाव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि २०१४नंतर ते पुन्हा जेतेपदासाठी खेळणार आहेत. जर्मनीने सर्वाधिक ८ वेळा फायनल खेळली आहे. अर्जेंटिनाने इटली व ब्राझील यांच्याशी बरोबरी केली. अलव्हारेझने दोन गोल केले. वर्ल्ड कप उपांत्य किंवा अंतिम फेरीत दोन गोल करणारा ज्युलियन अलव्हारेज ( २२ वर्ष व ३१६ दिवस) हा दुसरा युवा खेळाडू ठरला. १९५८मध्ये पेले यांनी १७ वर्ष व २४९ दिवसांचे असताना हा पराक्रम केला होता.
उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर मेस्सीने जाहीर केले की रविवारी होणारा अंतिम सामना हा त्याच्या कारकीर्दितील वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटचा सामना असेल. मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे, याची सर्वांना कल्पना होती, परंतु पुढेही मेस्सी वर्ल्ड कप खेळेल असे चाहत्यांना मनोमन वाटत होते. पण, मेस्सीने आता वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे जाहीर केले.
“माझ्या डोक्यातून सध्या खूप गोष्टी सुरू आहेत. हे सर्व पाहून खूप उत्सुकता आहे. संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आम्ही काहीतरी अविश्वसनीय अनुभवले आहे. आता एकच सामना बाकी आहे. हा माझा सर्वोत्तम वर्ल्ड कप आहे का? मला माहीत नाही. मी आता काही काळ त्याचा आनंद घेत आहे. कतारमध्ये आल्यापासून आम्ही खूप आनंद लुटला आहे. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात पराभवातून आमचा प्रवास सुरू झाला, पण आम्हाला विश्वास होता. मी सध्या कोणाचा विचार करत आहे? माझे कुटुंब. ते माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत,''असे मेस्सी म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"