नवी दिल्ली : बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन ' गोल्डन बूट ' पटकावण्याचा मान मिळवला आहे. ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत सर्धाधिक गोल करण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्यामुळेच त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मेस्सीने ला लिगा स्पर्धेत सर्वाधिक 34 गोल करण्याची किमया साधली होती. त्यामुळे या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये मेस्सी अव्वल स्थानावर होता. या पुरस्कारासाठी विशेष गुणांकन पद्धत होती. त्यानुसार मेस्सीने 68 गुण पटकावत अव्वल स्थान पटकावले. या शर्यतीत मोहम्मद सलाह आणि हॅरी केन हे दोन नामवंत फुटबॉलपटूही होते. पण सलाहला 32 आणि केनला 30 गुण मिळवता आले.ट
गेल्यावर्षीही मेस्सीने या पुरस्काराला गवसणी घातली होती. त्यापूर्वी 2010, 2012 आणि 2013 या वर्षांमध्येही मेस्सी या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. यावर्षी पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावत मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे. रोनाल्डोने आतापर्यंत चारवेळा हा पुरस्कार पटकावला होता.