लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण केले अन् गेली दशकं सुरू असलेल्या GOAT ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) या चर्चेलाही पूर्णविराम लागला. मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो यात GOAT कोण ही चर्चा आपण गेली दहाऐक वर्ष ऐकतोय आणि यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा ही दोन्ही महान खेळाडूंसाठी अखेरची असल्याने त्याचा फैसला कतारमध्येच होईल अशी अपेक्षा होती. अखेर ते झाले अन् मेस्सीने बाजी मारली. मेस्सीने वर्ल्ड कप विजयानंतर कट्टर प्रतिस्पर्धी रोनाल्डोला आणखी एक धक्का दिला.
४ गोल, गोल्डन बूट! मेस्सीची धाकधुक वाढवणार एमबाप्पे आहे तरी कोण?
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स ही फायनल अजरामर झाली. ८०व्या मिनिटापर्यंत २- ० अशी आघाडी घेणाऱ्या अर्जेंटिनाला गतविजेत्या फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेले. कायलिन एमबाप्पेने १ मिनिट ३७ सेकंदात दोन गोल केले अन् ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशी बरोबरी राहिली. ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात मेस्सीने १०८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, पण एमबाप्पे हार मानणारा नव्हता त्याने ११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली आणि सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या मेस्सी, डिबाला, लिएंड्रो पेडेरेस व गोंझालो मॉटेई यांनी गोले केले. फ्रान्सकडून एमबाप्पे व रँडल कोलो मौनी यांना गोल करता आले, तर किंग्स्ली कोमन व आरेलोना टी चौमेनी यांनी संधी गमावली.
या जेतेपदानंतर मेस्सीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वर्ल्ड कपसह पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टने सर्वाधिक लाईक्सचा रेकॉर्ड केला. यापूर्वी रोनाल्डोने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मेस्सीसह टाकलेल्या फोटोला ४१ मिलियन लाईस्क मिळाले होते, परंतु मेस्सीच्या या नव्या पोस्टला ५ कोटी ३७ लाखांहून ( ५३ मिलियन) अधिक लाईक्स मिळाले आहेत.
"वर्ल्ड चॅम्पियन्स!!!!!!!! हे स्वप्न मी खूप वेळा पाहिले, मला ते पूर्ण करायचे होते आणि म्हणून मी थांबलो नाही. पण, आता माझा यावर विश्वास बसत नाही. " असे मेस्सीने स्पॅनिशमध्ये इंस्टाग्रामवर लिहिले.
"माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणार्या सर्वांचे आणि आमच्यावर विश्वास ठेवणार्या सर्वांचे खूप खूप आभार. आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले की अर्जेंटाईन जेव्हा एकत्र लढतो आणि एकजूट होतो तेव्हा काही करू शकतो. अर्जेंटिनाचे स्वप्न देखील होते आणि आम्ही ते पूर्ण केले. आपण लवकरच एकमेकांना भेटू. "असे त्याने देशवासियांसाठी लिहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"