लिव्हरपूल : वर्षातील सर्वांत मोठ्या दिवशी लिव्हरपूल विजय नोंदवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे इंग्लिश प्रीमियर लीग(ईपीएल) फुटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लिव्हरपूलला गेल्या ३० वर्षांत ईपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही.ते यावेळी जेतेपद पटकावण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत, पण कोविड-१९ महामारीमुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. लीगला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रेक्षकांविना खेळल्या गेलेल्या लढतीत एव्हर्टनने त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखत त्यांची प्रतीक्षा वाढविली.दरम्यान, लिव्हरपूल २३ गुणांच्या आघाडीसह अव्वल स्थानी आहे आणि त्यांनी जर बुधवारी एनफिल्ड क्रिस्टल पॅलेसविरुद्ध विजय मिळवला तर त्यांची जेतेपदाची प्रतीक्षा संपेल.
सामन्याला विक्रमी ५० लाख टीव्ही प्रेक्षकलंडन : लिव्हरपूल-एव्हर्टन यांच्यात काल इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळल्या गेलेल्या फुटबॉल सामन्याला विक्रमी ५० लाख ब्रिटिश टीव्ही प्रेक्षक लाभले. गोलशून्य बरोबरीत सुटलेल्या या लढतीचा विक्रमी प्रेक्षकांनी आनंद लुटल्याची माहिती लीगचे प्रसारणकर्ते स्कायने दिली. तीन महिन्यानंतर प्रेक्षकांविना ब्रिटनमध्ये फुटबॉलची सुरुवात झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने सामन्याचे थेट प्रसारण फ्री टू एअर करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी २०१२ ला मॅन्चेस्टर सिटी आणि मॅन्चेस्टर युनायटेड यांच्यातील सामना ४४ लाख लोकांनी टीव्हीवर पाहिला होता. ड्रॉमुळे २३ गुणांसह लिव्हरपूल अव्वल स्थानावर कायम आहे.