मुंबई, दि. 14 - भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात उदया म्हणजेच 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. उद्या सकाळी 9.30 वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन' या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
उदया दिनांक 15 सप्टेंबर रोजी या दिवशी बॉम्बे जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत. मुंबई जिमखाना येथे मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुद्ध राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएकशन विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत. मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली विविध ठिकाणी फुटबॉल खेळणार असून शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे200 मैदानांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे उदया दिवसभर राज्यभरात दिवसभर मुले मुली फुटबॉल खेळताना दिसतील.
राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळून महाराष्ट्रात फुटबॉल मिशन एक मिलियनच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने (FIFA U-17 World Cup India 2017) देशात 1कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी कल्पना मांडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी 'महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन' ची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत उदया म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी राज्यभर 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी, युवक फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.
मुलांनी इ-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शिक्षण विभागाने 15 सप्टेंबर हा दिवस Non-Instructional Day दिला असल्यामुळे मोठया प्रमाणावर विद्यार्थी मैदानावर खेळायला किंवा खेळ पाहायला उपस्थित राहतील. मुंबईतील सुमारे २०० मैदांनावर फुटबॉलचे सामने खेळले जाणार असून त्यापैकी निवडक ठिकाणांची यादी खालीलप्रमाणे –
१. ओव्हल मैदान
२. क्रॉस मैदान
३. मुंबई जिमखाना
४. आझाद मैदान
५. पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह
६. पारशी जिमखाना, मरिन ड्राईव्ह
७. इस्लाम जिमखाना, मरिन ड्राईव्ह
८. विल्सन जिमखाना, मरिन ड्राईव्ह
९. शिवाजी पार्क, दादर
१०. कुपरेज मैदान
११. गोवन्स स्पोर्टींग क्लब
१२. कर्नाटक स्पोर्टींग क्लब
१३. मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन
१४. शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा
१५. नायगांव पोलीस मैदान, नायगांव (फुटबॉल)
१६. मुंबई विद्यापीठ, मरिन लाईन्स
१७. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन
१८. जिल्हा क्रीडा संकुल, धारावी
१९. प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल
२०. वरळी स्पोर्टस क्लब, वरळी
२१. एम.डी.एफ.ए.सेंट झेविअर्स मैदान, परेल पू.