लिव्हरपूल : फुटबॉल विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेला ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात उद्या रविवारी सराव सामना खेळला जाईल. या सामन्यादरम्यान अनेकांची नजर असेल ती स्टार स्ट्रायकर नेमारच्या फिटनेसकडेच.२०१४ च्या विश्वचषकात चार गोल नोंदविणारा नेमार फेब्रुवारीत पायाला झालेल्या दुखापतीनंतर कुठलाही सामना खेळलेला नाही. २६ वर्षांच्या नेमारने अद्याप संघाच्या सराव शिबिरातही भाग घेतलेला नाही. नेमारचा ब्राझील संघातील सहकारी फर्नांडिन्हो याने मात्र १४ जूनपासून सुरू होत असलेल्या विश्वचषकाआधी नेमार पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मँचेस्टर सिटी क्लबसाठी खेळणारा मिडफिल्डर फर्नांडिन्हो म्हणाला, ‘चेंडूसोबत सराव करताना नेमार ज्याप्रमाणे मुव्हमेंट आणि ड्रिबल करतो त्यावरून त्याचा फिटनेस चांगलाच असल्याचे संकेत मिळतात. तो बचावफळीतील खेळाडूंना न घाबरता खेळत आहे. आजच्या सामन्यात नेमारला बदली खेळाडू म्हणून मैदानात आणले जाईल, अशी शक्यता आहे.ब्राझीलला विश्वचषकाचा पहिला सामना १७ जुलै रोजी खेळायचा आहे. त्याआधी कुठलीही जोखीम पत्करायची नाही, असे सावध उत्तर ब्राझीलचे कोच टिटे यांनी दिले. त्याआधी तो १० जून रोजी व्हिएन्नात ब्राझीलकडून सराव सामन्यात काही वेळ खेळणार आहे. (वृत्तसंस्था)
नेमारच्या फिटनेसवर अनेकांची नजर, ब्राझील-क्रोएशिया यांच्यात सराव सामना आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:53 AM