पॅरिस : महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांच्या १९८६ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील गोल्डन बॉल ट्रॉफीचा पुढील महिन्यात लिलाव होणार होता. मात्र, ही ट्रॉफी चोरीला गेली असून, हा लिलाव रोखण्यासाठी गुन्हा दाखल करणार असल्याचे मॅराडोनाच्या उत्तराधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या वकिलांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.
फिफा विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला गोल्डन बॉल ट्रॉफी प्रदान केली जाते. मॅराडोना यांना मिळालेली ही ट्रॉफी सुमारे दशकभर गायब होती आणि नुकतीच ती पुन्हा सर्वांसमोर आली होती. अगुटेस ऑक्शन हाउसने गेल्याच आठवड्यात या ट्रॉफीचा पुढील महिन्यात लिलाव होणार असल्याचे जाहीर केले होते. २०२० मध्ये मॅराडोना यांचे वयाच्या ६०व्या वर्षी निधन झाले होते.