पोर्तुगाल : सर्वोत्तम फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोनाल्डोची तंदुरुस्ती वयाच्या 40व्या वर्षापर्यंतही कायम राहील, असा अनेकांना विश्वास आहे. पण, रोनाल्डोने त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. कदाचित मी पुढील वर्षीही निवृत्ती घेईन, असे धक्कादायक विधान त्याने केले आहे. त्यामुळे जगभरातील फुटबॉल वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रोनाल्डोने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत अनेक विक्रम केले. पोर्तुगालच्या या खेळाडूनं ला लीगा मध्ये रेयाल माद्रिदचे प्रतिनिधित्व करताना 292 सामन्यांत 311 गोल्स केले आहेत, तर 95 गोल्ससाठी सहाय्य केले आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये त्याने मँचेस्टर युनायटेडकडून 196 सामन्यांत 84 गोल्स केले आहेत व 45 गोल्ससाठी सहाय्य केले आहे. युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या चॅम्पियन्स लीगमधील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. 34 वर्षीय रोनाल्डोने 162 सामन्यांत 126 गोल्स केले आहेत. रोनाल्डो आता इटालियन क्लब युव्हेंटसचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यांच्यासाठी त्यानं सीरि ए लीगमधील 31 सामन्यांत 21 गोल केले आहेत.
रोनाल्डोला त्याच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला,''मी त्याबाबत फार विचार करत नाही. कदाचित मी पुढील वर्षीही निवृत्ती घेऊ शकतो किंवा मी 40 ते 41 व्या वर्षापर्यंतही खेळू शकतो. मलाही माहीत नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा, हे मी नेहमी सांगत आलो आहे. त्यामुळे मिळालेल्या या वरदानाचा मला आनंद लुटायचा आहे.''
रोनाल्डोने पाच वेळा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. त्यात त्याने अनेक विक्रमही नावावर केले आहेत. त्यावर तो म्हणाला,'' माझ्यापेक्षा अधिक विक्रम करणारा कुणी फुटबॉलपटू आहे का? माझ्यापेक्षा अधिक विक्रम नोंदवणारा खेळाडू कुणी असेल असे मला वाटत नाही."