नवी दिल्ली : सध्याच्या घडीला फुटबॉल जगतामध्ये दोन खेळाडू चांगलेच चर्चेत असतात, त्यामधला एक म्हणजे लिओनेल मेस्सी आणि दुसरा म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. या दोघांचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची कामगिरी कशी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या दोघांमधल्या स्पर्धेत कोणता खेळाडू बाजी मारतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच असते. युरोप खंडाचा विचार केला तर यंदाच्या हंगामात मेस्सी फक्त एका गोलमुळे रोनाल्डोपेक्षा वरचढ ठरल्याचे पाहायला मिळाले आहे.
यंदाच्या हंगामात युरोपातील सामन्यांमध्ये मेस्सीने 54 सामन्यांमध्ये 45 गोल केले आहेत. या 45 पैकी 34 गोल मेस्सीने फक्त ला लिगा या स्पर्धेत केले आहेत. त्यामुळेच मेस्सीला लाग लिगाचा यंदाचा ‘गोल्डन बूट’ हा पुरस्कारही देण्यात आला होता.
युरोप खंडातील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या स्पर्धेत मेस्सीला रीयाल माद्रिदच्या रोनाल्डोसह लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहने कडवी झुंज दिली. मेस्सीचे सर्वाधिक 45 गोल असले तरी रोनाल्डो आणि सलाह यांच्या नावावर प्रत्येकी 44 गोल आहेत. मेस्सीपेक्षा दोन सामने कमी खेळत सलाह त्याच्यापेक्षा फक्त एका गोलने पिछाडीवर आहे. दुसरीकडे रोनाल्डोने तर प्रत्येक सामन्यात एक गोलची सरासरी कायम राखली असून त्याने 44 सामन्यांत 44 गोल लगावले आहेत. पण फक्त एक गोल जास्त असल्यामुळे मेस्सीने ही बाजी जिंकली आहे.