लुसैल : कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा लियोनेल मेस्सी आणि ज्युलियन अल्वारेज यांच्या जोरावर अर्जेंटिनाने क्रोएशियाला फुटबॉल विश्वचषक उपांत्य सामन्यात ३-० ने नमवले. यासह अर्जेंटिनाने मेस्सीच्या नेतृत्त्वात दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
सलामीला सौदी अरेबियाकडून अनपेक्षित पराभूत झालेल्या अर्जेंटिनाने जी मुसंडी मारली ती एखाद्या कथानकाहून कमी नव्हतीच. आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या आपल्या देशातील चाहत्यांसह जगभरातील प्रशंसकांना मेस्सी अँड कंपनीने जल्लोष करण्याची संधी दिली. सामन्यादरम्यान मेस्सी वाकला आणि त्याने स्वत:च्या मांडीला घट्ट पकडले त्यावेळी चाहत्यांचा श्वास थांबला होता.
मेस्सी उपांत्य सामना सोडून देईल का, असे वादळ अनेकांच्या मनात घोंघावत होते. पण मेस्सी खेळला. त्याने विश्वचषकाच्या विक्रमी २५व्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीही केली. त्याने पेनल्टीवर गोल केलाच, शिवाय अल्वारेजच्या दोन गोलमध्ये सूत्रधाराची भूमिका बजावली.
मेस्सी होणार निवृत्त...
यंदाचा अंतिम सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीचाही शेवटचा सामना असणार आहे. या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचे मेस्सीने जाहीर केले. त्याने सध्याच्या विश्वचषकात पाच गोल केले असून विश्वचषकात अर्जेंटिनाचा सर्वाधिक ११ गोल करणारा खेळाडू ठरला. ‘अंतिम सामना खेळत माझा विश्वचषक प्रवास संपणार, याचा आनंद आहे,’ असे मेस्सीने सांगितले. ‘पुढील स्पर्धेसाठी बरीच वर्षे शिल्लक असून, मला ते शक्य होईल, असे वाटत नाही. अशाप्रकारे शेवट होणे हेच सर्वोत्तम आहे. क्रोएशियावरील विजयाचा आनंद घ्या. आम्ही अनेकदा खडतर स्थितीतून गेले आहोत. काही चांगले क्षणही अनुभवले. आज आम्ही एक वेगळाच अनुभव घेत आहोत,’ असेही मेस्सीने सांगितले.
मेस्सीचेटीकाकारांना जोरदार उत्तरविश्वचषक जिंकण्याचे वर्षानुवर्षे जोपासलेले स्वप्न पूर्ण करण्यापासून लियोनेल मेस्सी केवळ एकच पाऊल दूर आहे. वयाच्या ११व्या वर्षापासून हार्मोन्सशी संबंधित आजाराशी झुंज देण्यापासून जगातील महान फुटबॉलपटू होण्यापर्यंतचा मेस्सीचा प्रवास, लढवय्या वृत्ती, जिंकण्याच्या जिद्दीची गोष्ट आहे.अर्जेंटिना विश्वचषक जिंकल्यास मेस्सी हा पेले व दिएगो मॅरेडोना या महान खेळाडूंच्या पंक्तीत बसेल. सात वेळा बॅलोन डि ओर, विक्रमी सहावेळा यूरोपीयन ‘गोल्डन शूज’, बार्सिलोनासाठी विक्रमी ३५ जेतेपद, ला लिगा मध्ये ४७४ गोल, बार्सिलोनासाठी ६७२ गोल अशी कामगिरी करणारा मेस्सी कधीही विश्वचषक जिंकू शकला नाही.लियोनेल मेस्सीच्या विश्वचषक स्पर्धेचा प्रवास २००६ पासून सुरू झाला. २०१४ सालच्या विश्वचषकात अंतिम सामन्यात अर्जेंटिना जर्मनीकडून पराभूत झाल्यानंतर मेस्सीच्या खेळावर कठोर टीकाही झाली.
मेस्सीचा जादुई पास आणि...३४ व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर पहिला गोल केला. ज्युलियन अल्वारेजने ३९व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर पुन्हा मेस्सीने ६९व्या मिनिटाला अप्रतिम खेळ दाखवत क्रोएशियाच्या खेळाडूंना चकवित गोलपोस्ट गाठले. तेथे त्याला गोल करण्यासाठी जागा मिळाली नाही आणि त्याने अल्वारेजच्या दिशेने चेंडू मारला. अल्वारेजने आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. मेस्सीच्या शानदार पाससाठी हा गोल दीर्घकाळ स्मरणात राहील.
विश्वचषक उपांत्य सामन्यात १९५८ नंतर दोन गोल नोंदविणारा अल्वारेज दुसरा खेळाडू ठरला. पेलेने १९५८ ला १७ व्या वर्षी ही कामगिरी केली होती. बाद फेरी सामन्यात जपान आणि ब्राझीलला पेनल्टी शूटआउटमध्ये हरविणाऱ्या क्रोएशियाचा ३७ वर्षांचा स्टार मिडफिल्डर लुका मॉड्रिच याचा हा अखेरचा विश्वचषक होता.