- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर मोरोक्को फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, मात्र त्यांचा प्रवास फारच आकर्षक ठरला. गतिवजेत्या फ्रान्सविरुद्ध या संघाने झुंज देत दाखविलेले धैर्य, दृढनिश्चय आणि महत्त्वाकांक्षेचे सर्वांनीच कौतुक केले. त्यामुळे हरल्यानंतरही मोरोक्को जिंकला.
यंदाच्या विश्वचषकात अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली. बायबलमधील मिथकाप्रमाणे कमुकवत संघांकडून दिग्गज हरले. अधिक बलाढ्य संघांना लहान संघांनी दडपणात आणले.१९८३ च्या विश्वचषकात चॅम्पियन वेस्ट इंडीजवर भारताचा अनपेक्षित विजय हे खेळातील धक्कादायक निकालाचे उत्कृष्ट उदाहरण ठरावे. विश्वचषकात भारत उपांत्य फेरी गाठेल, असे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. कपिलच्या संघाने झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला लागोपाठ पराभूत करून अंतिम फेरी गाठली. नंतर क्लाइव्ह लॉईडच्या बलाढ्य संघालादेखील खुजे ठरविले. असे वीरतापूर्ण विजय केवळ खेळापुरतेच नव्हे, तर राष्ट्राच्या उद्धारातही बदल घडविणारे ठरतात. आयटी, वैद्यकीय आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रातही स्पर्धा करू शकतो, असा विश्वास यामुळे बळावतो.१९८३ च्या विश्वविजयाने देशातील क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. भारतीयांमध्ये आत्मविश्वासाची भावना जागवली. जगातील सर्वोत्कृष्ट संघांसोबत स्पर्धा करण्यास आणि त्यांना नमविण्यास सज्ज आहोत, हा विश्वास निर्माण केला. मोरोक्काेची फिफा विश्वचषकातील वाटचाल त्यांच्या नागरिकांसाठी आत्मविश्वास उंचाविणारी आहे.
विश्वचषकात ३२ सर्वोच्च संघ कठोर संघर्ष करतात. त्यामुळे प्रत्येक विजयाचा आनंद घेता येतो. लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना आणि उरुग्वे किंवा युरोपमधील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन या देशांसारखी समृद्ध परंपरा आणि वारसा नसलेल्या संघांसाठी उपांत्य फेरी गाठणे हीदेखील विलक्षण कामगिरी आहे. फुटबॉलसह आयुष्यातील इतर क्षेत्रात मोरोक्कोचे नागरिक इथून कसा प्रवास करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
सर्वोत्तम संघ फायनलमध्ये रविवारी अर्जेंटिना- फ्रान्स यांच्यात अंतिम फेरी खेळली जाईल. मी मोरोक्कोच्या शानदार कामगिरीचे कौतुक केले. दुसरीकडे ब्राझील, पोर्तुगाल, जर्मनी, स्पेन हे अनेकांचे आवडते संघ, पण फ्रान्स आणि अर्जेंटिना हे स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ आहेत यात काही शंका नाही. दोन्ही संघांनी कौशल्यपूर्ण आणि चमकदार खेळाचे दर्शन घडवित फायनलपर्यंतचा प्रवास सर केला. दोन्ही संघांच्या खेळाची शैली विरोधाभासी आहे. अर्जेंटिनाचे चपळ फूटवर्क आणि क्लिष्ट कौशल्ये, लॅटिन अमेरिकन फुटबॉलच्या कलात्मकतेचे वैशिष्ट्य विरुद्ध युरोपियन फुटबॉलचा वेग, ऊर्जा आणि सामर्थ्य फ्रान्स संघाला सर्वोत्तम ठरवते. या लढाईत आणखी एक लक्षवेधी लढाई म्हणजे लियोनेल मेस्सी विरुद्ध काईलियन एमबाप्पे! ३५ वर्षांच्या मेस्सीची देशाला विश्वचषक जिंकून देण्याची इच्छा आहे. देशापेक्षा क्लबसाठी चांगली कामगिरी करीत असल्याची त्याच्यावर अनेकदा टीका झाली. तो डाग पुसण्याची ही संधी असेल. अर्जेंटिना जिंकल्यास, मेस्सी हा दिएगो मॅराडोनासोबतच ‘आयकॉन’ म्हणून ख्यातीप्राप्त ठरेल. २३ वर्षांच्या एमबाप्पेची ओळख मेस्सी आणि रोनाल्डोचा समकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू अशी आहे. फ्रान्सने विजय मिळवल्यास एमबाप्पे सुपरस्टार बनेल. एमबाप्पे डाव्या बाजूने स्वत:च्या पदलालित्याची जादू दाखवतो. अर्जेंटिनासाठी सर्वांत मोठा धोका तोच असेल. अंतिम सामना सर्व वयोगटातील चाहत्यांना सुखावणारा ठरेल, यात शंका नाही.