कोलकाता, 4 मे: गतविजेता मोहन बागान सुपर जायंटवर 3-1 असा विजय मिळवत मुंबई सिटी एफसीने दहाव्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम फेरीत शनिवारी 0-1 अशा पिछाडीनंतर उत्तरार्धात 3 गोल करताना माजी विजेत्यांनी अविस्मरणीय विजयाची नोंद केली. मुंबई सिटी एफसीचे हे दुसरे आयएसएल जेतेपद आहे.
कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर 44व्या मिनिटाला गोल करताना यजमानांनी आघाडी राखली. मात्र, उत्तरार्धाच्या सुरुवातीला बरोबरी साधली. शेवटच्या 16 मिनिटांत दोन गोल करताना माजी विजेत्यांनी 3-1 अशा फरकाने दिमाखात ट्रॉफी उंचावली. जॉर्ज परेरा डियाझ, बिपीन सिंग आणि जाकुब व्होजटस त्यांच्या फायनल विजयाचे शिल्पकार ठरले. 2021-22 नंतर मुंबई सिटी एफसीने पुन्हा जेतेपदाला गवसणी घातली. तसेच 2023-24 शील्ड लीगच्या निर्णायक लढतीतील पराभवाचा सव्याज वचपा काढला.
यजमानांचा गोल आघाडीचा आनंद आठ मिनिटे टिकला. मुंबई सिटी एफसीला मध्यंतराच्या सुरुवातीलाच पिछाडी भरून काढण्यात यश आले. अल्बर्टो नोग्युएराच्या पासवर गोलपोस्टपासून सहा यार्डावरून जॉर्ज परेरा डियाझने डाव्या पायाने प्रतिस्पर्धी गोलकीपर व्ही. कैथ याला चकवले आणि टीमला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या गोलमुळे पाहुण्यांनी सामन्यात दमदार पुनरागमन केले.
सामना बरोबरीकडे झुकणार, असे वाटत असतानाच 81व्या मिनिटाला अटॅकर बिपीन सिंग हा मुंबई सिटी एफसीच्या मदतीला धावून आला. विक्रम प्रताप सिंगच्या पासवर स्ट्रायकर लालियानझुआला छांग्टेला ब्लॉक करण्याच्या प्रयत्नात मोहन बागान सुपर जायंटच्या ढिसाळ बचावाचा फायदा घेत जाकुब व्होजटसच्या पासवर आघाडीच्या फळीतील बिपीन सिंगने उजव्या बाजूने चेंडूला अचूक गोलजाळ्यात ढकलले. निर्धारित वेळेच्या 9 मिनिटे 2-1 अशा आघाडीमुळे पाहुण्यांचा आत्मविश्वास वाढला.
वाढलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी अतिरिक्त वेळेत आणखी एक गोलची भर टाकताना 3-1 अशा मोठ्या फरकाने 2020-21नंतर इंडियन सुपर लीग जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीतील पराभवानंतर मोहन बागान सुपर जायंटचे सलग दुसर्या जेतेपदाचे स्वप्न भंगले.
तत्पूर्वी, अर्धा डझन पेनल्टी कॉर्नरसह (6-1) सर्वाधिक पासेस (229-129) आणि क्रॉस मारण्यात (16-3) मुंबई सिटी एफसीने पुर्वार्धावर वर्चस्व राखले तरी मध्यंतरापूर्वी, एक मिनिट आधी जेसन स्टीव्हन कमिंग्जने उजव्या कॉर्नरने सुरेख गोल करताना मोहन बागान सुपर जायंटना आघाडीवर नेले.
43व्या मिनिटाला लिस्टन कॉलॅकोच्या पासवर दिमित्री पेट्राटॉसने 35हून अधिक लांब यार्डावरून मारलेला फटका पाहुण्यांचा गोलकीपर पी. लचेप्नाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू हातातून निसटला. त्याचा फायदा घेत जेसन कमिंग्जने उठवला. गोलकीपर पुढे आल्याने चेंडूला डाव्या बाजूने गोलजाळ्यात टाकण्यात त्याला यश आले. यानंतर यजमानांच्या गोटासह त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
मुंबई सिटी एफसीकडून आक्रमक सुरुवात झाली. चौथ्या मिनिटाला लालियानझुआला छांग्टेच्या पासवर टिरीने मारलेला हेडर गोलपोस्टच्या अगदी जवळून गेला. सातव्या मिनिटाला राहुल भेकेने लालेंगमाविया राल्टेच्या पासवर 35 यार्डांवरून मारलेला चेंडू डाव्या बाजूने बाहेर गेला. 13 आणि 14व्या मिनिटाला मोहन बागान आणि मुंबई सिटीने पहिल्यांदा पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र, त्यावर गोल झाला नाही.
पुढे मुंबई सिटी एफसीने आणखी पाच पेनल्टी कॉर्नर मिळवले. चेंडूवरही अधिक ताबा ठेवला. मात्र, गोलफलक कोराच राहिला. पाहुण्यांनी पुर्वार्धात बर्यापैकी वर्चस्व राखले तरी 44व्या मिनिटाला जेसन कमिंग्जने गोल करताना यजमानांना आघाडी मिळवून दिली.
निकाल - मोहन बागान सुपर जायंट 1(जेसन कमिंग्ज 44व्या मिनिटाला) पराभूत वि. मुंबई सिटी एफसी 3(जॉर्ज परेरा डियाझ 53व्या मिनिटाला, बिपीन सिंग 81व्या मिनिटाला, जाकुब व्होजटस 90+7व्या मिनिटाला)
आयएसएल 2023-24 अवॉर्ड्स
- गोल्डन ग्लोव्ह - फुरबा लचेंपा (मुंबई सिटी एफसी)- गोल्डन बूट - दिमित्रीओस डायमंटाकोस (केरळ ब्लास्टर्स एफसी)- उदयोन्मुख खेळाडू - विक्रम प्रताप सिंग (मुंबई सिटी एफसी)
- सर्वोत्तम खेळाडू - दिमित्रीओस पेट्राटोस (मोहन बागान सुपर जायंट)