सरांस्क : विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी सर्वांची नजर त्यांच्यावर होती. जगभरात त्यांचे पोस्टर्स व टी-शर्टच्या विक्रीने नवे विक्रम नोंदवले होते, पण फिफा विश्वकप २०१८ मध्ये आतापर्यंत नेमार, मेस्सी व सलाह यांसारख्या स्टार खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.दोन सामन्यात एका हॅट््ट्रिकसह चार गोल करणारा पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डोचा अपवाद वगळता अन्य स्टार खेळाडूंना छाप सोडता आलेली नाही. जगातील सर्वांत महागडा खेळाडू ब्राझीलच्या नेमारसोबत तर वाईट घडले. स्वित्झर्लंडविरुद्ध १-१ ने अनिर्णीत संपलेल्या पहिल्या लढतीत त्याने १० फाऊल केले. १९९८ च्या विश्वकप स्पर्धेनंतर कुणा एका खेळाडूने एका लढतीत केलेले हे सर्वाधिक फाऊल ठरले.लियोनेल मेस्सीला अर्जेंटिनासाठी कामगिरीत सुधारणा करता आली नाही. आपला अखेरचा विश्वकप खेळत असलेल्या मेस्सीचे जेतेपदाचे स्वप्न भंग पावत असल्याचे दिसून येत आहे. इजिप्तच्या मोहम्मद सलाहच्या फिटनेसवर सर्वांची नजर होती. उरुग्वेविरुद्ध पहिल्या लढतीत पराभव स्वीकारताना तो संघाबाहेर होता. रशियाविरुद्ध त्याने एकमेव गोल केला, पण इजिप्तला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.>रोनाल्डोने स्पेनविरुद्ध पहिल्या लढतीत हॅट््ट्रिक नोंदवत आपला निर्धार जाहीर केला. स्पेनतर्फे आतापर्यंत चारपैकी तीन गोल डिएगो कोस्टाने केले तर इंग्लंडतर्फे दोन्ही गोल हॅरी केनने नोंदवले. फ्रान्सने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने मिळवलेल्या विजयाचा हीरो ठरला १९ वर्षीय काइलियान एमबाप्पे. तो फ्रान्सतर्फे विश्वकप स्पर्धेत गोल नोंदविणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला.
नेमार, सलाह, मेस्सी अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:09 AM