रोहित नाईकनवी मुंबई : १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटातून बाद फेरी निश्चित केलेल्या पॅराग्वेने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात तुर्की संघाचा ३-१ असा पराभव करून गटविजेतेपद पटकावले. यासह तुर्कीचे युवा विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पॅराग्वेने ९ गुणांसह बाद फेरीत धडक मारली आहे.नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पॅराग्वेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत आपला इरादा स्पष्ट केला. बाद फेरीसाठी विजय आवश्यक असलेल्या तुर्कीचा बलाढ्य पॅराग्वेपुढे निभाव लागला नाही. सामन्याच्या दुसºयाच मिनिटाला केलेल्या फाऊलचा फटका तुर्कीला बसला आणि पॅराग्वेला पेनल्टी किक मिळाली. परंतु, अनिबेल वेगा याची किक तुर्कीचा गोलरक्षक बेर्क ओझर याने यशस्वीपणे रोखली. या वेळी, तुर्की चमक दाखवणार अशी आशा होती. परंतु, पॅराग्वेने आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यावर शेवटपर्यंत नियंत्रण राखले.४१व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर जीओवानी बोगाडो याने अप्रतिम गोल करत पॅराग्वेला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर लगेच ४३व्या मिनिटाला फर्नांडो गॅलेनो याने वेगवान गोल करत मध्यंतराला पॅराग्वेला २-० अशी आघाडी मिळवून दिली.दुसºया सत्रात तुर्कीकडून पुनरागमनाची अपेक्षा होती. पण, पॅराग्वेच्या बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. ६१व्या मिनिटाला अँटोनिओ गॅलेनो याने कॉर्नर किकद्वारे मिळालेला पास अचूकपणे साधला आणि पॅराग्वेचा तिसरा गोल करुन संघाला ३-० अशा भक्कम आघाडीवर नेले.निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेत केरेम केसगिन याने शानदार गोल करत तुर्कीकडून पहिला गोल नोंदवला; पण तोपर्यंत उशीर झाला होता.
पॅराग्वेची बाद फेरीत धडक, ३-१ असा दणदणीत विजय : तुर्कीचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:04 AM