मिलान : प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध अनिर्णीत राहिलेला सामना इटलीला चांगलाच महागात पडला आहे. या सामन्यानंतर इटलीच्या विश्वचषकातील आशा संपुष्टात आल्या. सामना बरोबरीत राखणा-या स्वीडनने २०१८ च्या फिफा विश्वचषकात स्थान निश्चित केले.चारवेळा विश्वचॅम्पियन्स राहिलेल्या इटलीला हा मोठा धक्का आहे. गेल्या ६० वर्षात विश्वचषकासाठी अपात्र ठरण्याची नामुष्की संघावर ओढवली आहे. तर, दुसरीकडे स्वीडनचा संघ २००६ नंतर दुुस-यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरला.विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीत इटलीसमोर स्वीडनचे आव्हान होते. यापूर्वी स्वीडनने इटलीला १-१ असे पराभूत केले होते. पहिल्या फेरीत स्टॉकहोमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात जॅकब योहानसनच्या गोलच्या जोरावर स्वीडनने इटलीला पराभूत केले होते.परिणामी दुसºया सामन्यात स्वीडनला पराभूत करणे इटलीसाठी अनिवार्य झाले होते. पण, सामन्यात उभय संघांकडून गोल झाला नाही. यापूर्वी १९५८ मध्ये इटलीला विश्वचषकात स्थान मिळवण्यात अपयश आले होते.इटलीच्या खेळाडूंचे चेंडूवर बराचवेळ वर्चस्व होते. पण गोल नोंदविण्यात त्यांना अपयश आले. २००६ चा विजेता इटली संघ ७४ हजार पाठिराख्यांच्या प्रोत्साहनानंतरही गोल नोंदविण्यासाठी अक्षरश: संघर्ष करताना दिसला. गोलकीपर बुफोनची निवृत्ती-६० वर्षांत पहिल्यांदा विश्वचषकापासून वंचित राहिलेल्या इटलीचा गोलकीपर जिर्यालुईगी बुफोन याने आंतरराष्ट्रीय फूटबॉलमधून निवृत्ती पत्करली. इटलीसाठी त्याने १७५ वा आणि स्वीडनविरुद्ध अखेरचा सामना खेळला.‘ अशाप्रकारे अलविदा होत असल्याचा मला खेद आहे. मी इटलीच्या चाहत्यांची माफी मागतो, असे त्याने रडत रडत सांगितले. त्याच्यासोबतच इटली संघातील मिडफिल्डर डॅनियल रोस्सी आणि आंद्रिया बार्जागली यांनीदेखील खेळाला रामराम ठोकला.इटलीचा संघ तीनदा विश्वचषकापासृून वंचित राहिला. १९३० मध्ये या संघाला प्रवेश मिळू शकला नव्हता.त्यानंतर १९५८ मध्ये हा संघ दुसºयांदा विश्वचषकाची पात्रता सिद्ध करू शकला नव्हता. यंदा पुन्हा एकदा या संघाला अपयश आले.
खेळाडू रडले : ६० वर्षात पहिल्यांदाच नामुष्की, चारवेळेचा चॅम्पियन इटली विश्वचषकाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:30 AM