नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सराव सत्रादरम्यान १७ वर्षांखालील भारतीय संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. पहिल्यांदाच फिफा स्पर्धा खेळत असलेल्या युवा भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचणार आहे.पटेल यांनी खेळाडूंचा मानसिक दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवताना सांगितले की, ‘तुम्ही या सुवर्ण क्षणांचा आनंद घ्यायला हवा. आज संपूर्ण देश तुम्हाला पाठिंबा देत आहे. सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये सुमारे ५० हजार प्रेक्षक तुम्हाला पाठिंबा दर्शवतील. याचे तुम्ही अजिबात दडपण घेऊ नका. तुम्ही तुम्ही केवळ मनापासून खेळा.’यादरम्यान, पटेल यांनी प्रत्येक खेळाडूशी वैयक्तिकरीत्या संवाद साधतानाच संघाचे प्रमुख प्रशिक्षक लुईस नॉर्टन दि मातोस यांनाही स्पर्धेतील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पटेल यांच्या भेटीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचा विंगर कोमल थटाल याने म्हटले की, ‘प्रफुल पटेल यांची भेट आमच्यासाठी उत्साह वाढवणारी ठरली. यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.’
प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय संघाची भेट घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 3:36 AM