माद्रिद : स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम पासवर मारियो मॅन्झुकिचने केलेल्या गोलच्या जोरावर यूवेंट्स संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या ‘एच’ गटात वेलेंसिया संघाला १-० असे नमविले. यासह यूवेंट्सने स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. हा सामना रोनाल्डोसाठी ऐतिहासिक ठरला. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासात रोनाल्डोने या विजयासह आपला शंभरावा विजय नोंदवला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला हे विशेष.आॅक्टोबर २००३ मध्ये मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्ये पदार्पण केले होते. स्टुट्गार्टविरुद्धच्यात्या सामन्यात त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र पुढच्याच सामन्यात रेंजर्स क्लबला पराभूत करून रोनाल्डोने पहिल्या विजयाची चव चाखली. चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक १२१ गोल्सचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी यूवेट्स संघाला केवळ एका गुणाची आवश्यकता होती. ५९व्या मिनिटाला वेलेंसियाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या रोनाल्डोने अप्रतिम कौशल्य दाखविताना प्रतिस्पर्धी बचावपटूला चकवत मॅन्झुकिचला अचूक पास दिला. यावर मॅन्झुकिचने सहज गोल करत यूवेंट्सला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत यूवेंट्सने विजयी आगेकूच केली. त्याचबरोबर वेलेंसिया संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.दुसरीकडे हा सामना चर्चेत राहिला तो रोनाल्डोच्या विक्रमी कामगिरीमुळे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासामध्ये शंभर विजयी सामने खेळणारा रोनाल्डो पहिला फुटबॉलपटू ठरला. याआधी रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडकडून २६, तर रेयाल माद्रिदकडून ७१ विजय मिळवले होते. यूवेंट्सकडून खेळताना रोनाल्डोने तिसरा विजय मिळवला. तसेच यूवेंट्सने साखळी फेरीत सलग सहा सामने जिंकण्याची कामगिरीही करतानाच पहिल्यांदाच सलग पाचव्यांदा चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला.