माद्रिद : दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने स्पेनमध्ये करचोरीप्रकरणी १.९ कोटी युरो (२.३ कोटी डॉलर) दंड भरुन प्रकरण निकाली काढल्यामुळे त्याला आता कोठडीची हवा खावी लागणार नाही. पोर्तुगालचा कर्णधार आणि जगातील सर्वांत महागड्या फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोच्या चाहत्यांना यामुळे मोठा दिलासा लाभला.कर चोरीप्रकरणी रोनाल्डोने शुक्रवारी प्रकरण निकाली काढले. काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोने सर्वांत मोठी डील करीत इटलीच्या ज्युवेंट्स क्लबसोबत ९५० कोटींचा करार केला हे विशेष. सल्लागार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर रोनाल्डोने ही रक्कम ठरल्यामुळे दोन वर्षांच्या कोठडीची शिक्षा टळल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. स्पेनमध्ये दोन वर्षांच्या पहिल्या अहिंसक शिक्षेसाठी दोषींना शिक्षा दिली जात नाही. याप्रकरणी रोनाल्डोने मागच्या वर्षी जुलैमध्ये न्यायालयापुढे अपील केले होते. तो न्यायालयात हजरही होता. पण स्पेनच्या अधिकाऱ्यांनी या खेळाडूवर २०१४ साली कराचा भरणा करताना अफरातफर करण्याचा आरोप लावला होता. (वृत्तसंस्था)मेस्सीलाही झाली होती २१ महिन्यांची शिक्षाअर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा सुपरस्टार लियोनेल मेस्सी याला देखील २०१६ साली ४.७ मिलियन डॉलरची कर चोरी केल्याप्रकरणी दोषी धरण्यात येऊन २१ महिन्यांच्या कोठडीची शिक्षा झाली होती. नंतर शिक्षा टाळण्यासाठी मेस्सीने न्यायालयात दोन कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविली. रोनाल्डोने कोर्टात स्वत:ची बाजू मांडताना आपण हेतूपुरस्सर हे काम केले नाही, तरीही कट केल्यासारखे आरोप ठेवण्यात आल्याचा युक्तिवाद केला होता. अखेर दोन कोटीच्या दंडानंतर हे प्रकरण मिटले होते.
रोनाल्डो कोठडीपासून बचावला; फुटबॉल चाहत्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:46 AM