- रणजित दळवीलिओनेल मेस्सीला देवत्व बहाल करणाऱ्या चाहत्यांना तो एक माणूसच आहे, याची कल्पना आता आली असावी! शनिवारी मोक्याच्या क्षणी तो अडखळला. थंड डोक्याने आइसलँडविरुद्ध पेनल्टी घेताना तो का बरे थिजला, हा विचार त्याच्या अगणित चाहत्यांच्या मनात आला असणार. त्याच्या आदल्याच दिवशी ख्रिस्तियानो रोनाल्डोने ज्याप्रकारे डेहीला पेनल्टीवर गोल करून निरुत्तर केले, तसेच मेस्सीला प्रतिस्पर्धी गोलरक्षक हॅल्लडॉरसनने! मेस्सीच्या मनात काय चालले आहे, ते त्याने पक्के हेरले. म्हणूनच तो उजवीकडे झेपावला आणि आश्चर्य हे की, मेस्सीचा फटका तसा दिशाहीन आणि कमजोर ठरला. ‘इट वॉज अ पूअर पेनल्टी’. या घटकेला ही पहिली लढत जरी बरोबरीत सुटली असली, तरी त्यामुळे अर्जेंटिनाची पुढची वाटचाल कठीण आहे, असे मुळीच नाही. याचे परिणाम कैक होतील. एक तर आपल्याला खेळाचा स्तर उंचवावा लागेल, हे अर्जेंटिनाला पक्के समजले, पण तो उंचावण्यासाठी कराव्या लागणाºया उपाययोजना, नवे डावपेच यांची केवळ आखणीच नव्हे, तर अंमलबजावणीही तेवढीच प्रभावी व काटेकोरपणे करावयास हवी, हे या व्यावसायिकांच्या दृष्टीने नित्याचेच.या लढतीदरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की, आइसलँडसारखा अतिभक्कम बचाव करणाºया संघासमोर अर्जेंटिनाची आघाडीची फळी एखाद्या दात नसलेल्या वाघासारखी दिसली. त्यात त्यांनी मेस्सीला त्याच्या नित्याच्या आक्रमक भूमिकेमध्ये का नाही वापरले? माशारेनो आणि मेस्सी मध्यक्षेत्रातून ज्या उपाययोजना करत होते, त्या विफल ठरत होत्या. आइसलँडसाठी हा पहिलाच विश्वचषक होता आणि ‘फुटबॉल इज अ वे आॅफ लाइफ’ हे ब्रीदवाक्य छातीवर मिरवणाºया विश्वविजेत्यांकडून मानहानिकारक पराभव पत्करावयाचा नाही, एवढाच त्यांचा उद्देश होता. त्यात ते यशस्वी तर झालेच, पण गटातील क्रोएशिया आणि नायजेरिया यांना ‘आम्हीही स्पर्धेत आहोत, कमी लेखण्याची चूक करू नका’ असा इशारा दिला आहे.आइसलँडशी झालेल्या बरोबरीनंतर अर्जेंटिनाला मेस्सीचा ‘रोल’ निश्चित करावा लागेल. एक तर महानता प्राप्त करण्यासाठी त्याला शेवटची संधी आहे. दुसरी गोष्ट ही की, संघ निवडीमध्ये त्याचा मोठा हात आहे, असे म्हटले जाते. त्यांचा पुढील मुकाबला आहे क्रोएशियाशी, जो हलका संघ निश्चितच नाही. आइसलँड आणि अर्जंेटिना लढतीचे क्रोएशिया बारकाईने निरीक्षण करून मेस्सीला रोखण्याची ठोस उपाययोजना आखेल. त्यांनी मेस्सीला गोलक्षेत्राच्या आसपास जराही ‘स्पेस’ दिली नाही. त्याला आपल्या गोलचा ‘क्लिअर व्ह्यू’ मिळू न देणे जर क्रोएशियाला जमले, तर निम्म्याहून अधिक लढाई जिंकल्यासारखे आहे.सुरुवातीच्या लढाईनंतर रोनाल्डो श्रेष्ठ की मेस्सी हा वाद तापेल की काही काळ शमेल? रोनाल्डो आक्रमकाच्या भूमिकेत खेळला, त्याला त्यामुळे अधिक गोल करण्याची संधी मिळाल्याने त्याच्या पथ्यावर पडले. मेस्सीला ते भाग्य लाभले नाही. कदाचित, संघाच्या गरजा भागविणे त्याला किंवा त्यांच्या व्यवस्थापनाला योग्य वाटेल. त्या पेनल्टीवर गोल झाला असता, तर चित्रच बदलले असते. दोघांनी पेनल्टी किक घेण्यासाठी जी आठ - दहा पावले घेतली, तीच सध्या या दोघांमधील फरक दाखवून गेली. या वेळी महानता सिद्ध करण्याच्या शर्यतीत रोनाल्डोने काही पावलांची आघाडी घेतली आहे.
महानतेच्या शर्यतीत रोनाल्डो काही पावले आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:43 AM