माद्रिद - मागील दोन दशकापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्पेनमधील करचुकवेगिरी चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा त्याने मान्य केली असून स्पॅनिश अथॉरिटीने ठोठावलेला 12.1 कोटी पाऊंडचा दंड भरण्याचेही त्याने मान्य केले आहे. भारतीय चलनात ही रक्कम 109 कोटी इतकी होते. युव्हेंट्स क्लबशी करार करताना 33 वर्षीय रोनाल्डोने रेयाल माद्रिद आणि स्पेन यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले. त्यामुळे त्याने सर्व देणी देण्यास प्राधान्य दिले. त्याशिवाय त्याने स्पेनच्या राजधानीत असलेले सर्व व्यावसायिक करारही संपुष्टात आणण्याची तयारी दर्शवली आहे. रोनाल्डोने 12.1 कोटी पाऊंड रक्कम भरल्याचे वृत्त कॅडेना कोप या रेडिओ स्टेशनने दिले आहे आणि तो आणखी 4.7 कोटी पाऊंड दंड भरणार आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे रोनाल्डोला जेलमध्ये जावे लागणार नाही. कारण, स्पेनमधील नियमानुसार प्रशासकीय गुन्ह्यात प्रथमच दोषी आढळलेल्या आरोपीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कारागृहाची शिक्षा माफ होते. रोनाल्डो सध्या चीन दौ-यावर आहे.
रोनाल्डोची जेल टळली; 1,09,28,89,454.18 रु. किंमत मोजली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 6:20 PM