युव्हेंट्स - पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने फुटबॉलपटूंच्या ट्रान्सफर बाजारात नुकताच धुमाकूळ उडवून देणारा निर्णय घेतला. रेयाल माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीग जेतेपदाची हॅटट्रिक साजऱ्या करणाऱ्या रोनाल्डोने युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वयाचे खेळाडू चीन लीगमध्ये खेळण्याचा पर्याय निवडतात. पण रोनाल्डो त्याला अपवाद ठरला आणि त्याने इटालियन क्लब जॉईन केला. पण या क्लबने रोनाल्डोची वयचोरी जगासमोर आणली आहे. ३३ वर्षीय रोनाल्डोची तंदुरुस्ती युवा फुटबॉलपटूंसाठी अभ्यासाचा विषय आहे. जगातील सर्वात तंदुरुस्त ॲथलिट म्हणून रोनाल्डो ओळखला जातो आणि या दाव्याला पुष्टी देणारा प्रसंग समोर आला आहे. युव्हेंट्स क्लबने केलेल्या मेडिकल टेस्टमध्ये रोनाल्डोच्या चाहत्यांना अपेक्षित असलेला अहवाल समोर आला आहे. रोनाल्डोची फिटनेस लेव्हल पाहता तो ३३ वर्षांचा वाटतही नाही. २० वर्षीय फुटबॉलपटूमध्ये असलेली ऊर्जा रोनाल्डोत आहे. याउलट माद्रिदने केलेल्या चाचणीत त्याची तंदुरुस्ती २३ वर्षांच्या खेळाडूसारखी असल्याचे आढळले होते. एका महिन्याच्या आत रोनाल्डो ३ वर्षांनी कमी झाल्याने त्याचे पाठीराखे नक्की आनंदात असतील आणि तेही रोनाल्डोसारखा फिटनेस राखण्यासाठी प्रयत्न करतील.रोनाल्डोच्या शरीरावर केवळ ७% मांस असल्याचे युव्हेंट्सच्या मेडिकल टीमने सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या वयातील एखाद्या व्यक्तीच्या मांसचे प्रमाण हे साधारण ४६% असते. रोनाल्डोच्या मसल्स मांसची टक्केवारी ही ५०% आहे. त्यावरून तो किती तंदुरुस्त आहे याची कल्पना तर येतेच शिवाय तो इटालियन सीरी A लीगमधील प्रतिस्पर्धीना किती त्रास देऊ शकतो याचा अंदाज बांधू शकतो. रोनाल्डो ताशी ३३. ९८ किलोमीटर या वेगाने पळतो. त्यामुळे तो ३३ वर्षांचा असल्याचा दावा करत असला तरी त्याची तंदुरुस्ती २० वर्षीय फुटबॉलपटू एवढीच आहे.
रोनाल्डोची वयचोरी, म्हणे मी ३३ वर्षांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 9:29 AM