बंगळुरू : सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल स्वीकारल्याने भारताला सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत कुवेतविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही अखेरच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे भारताला विजयापासून दूर रहावे लागले.
दोन्ही संघांनी याआधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला असल्याने हा सामना औपचारिकतेचा ठरला होता. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केल्यानंतर भारतीयांनी सुनील छेत्रीच्या नेतृत्वात जबरदस्त पकड मिळवली. चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण राखत भारतीयांनी कुवेतवर दडपण आणले. मध्यंतराच्या अतिरिक्त वेळेत कर्णधार छेत्रीने अनिरुद्ध थापाने दिलेल्या पासवर अप्रतिम गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
ही आघाडी भारताने जवळपास अखेरपर्यंत कायम राखली. परंतु, ८१व्या मिनिटाला छेत्रीला विश्रांती दिल्यानंतर कुवेतने जोरदार मुसंडी मारली. अन्वर अलीकडून ९२व्या स्वयंगोल झाल्याने कुवेतला बरोबरी साधता आली. स्पर्धेत एकूण पाच गोल केलेल्या छेत्रीने या सामन्यात एक गोल करत ९२वा वैयक्तिक आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला.