मुंबईः ब्राझील, अर्जेंटिना, इटली, जर्मनी, पोर्तुगाल या देशांमध्ये फुटबॉल हा जणू धर्मच आहे. तिथे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तातच फुटबॉलवेड असतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळेच, हे देश गेली अनेक वर्षं फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवताहेत. एक खेळाडू निवृत्त व्हायची खोटी; त्यांच्याकडे दुसरा - त्याच्यापेक्षा जबरा खेळाडू तयारच असतो. पेले, मॅरेडोना यांचा वारसा रोनाल्डो, रोनाल्डिनो, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनल मेस्सी, डी मारिया, बेन्झिमा, लुइस सुवारेझ हे शिलेदार पुढे नेत आहेत. त्यांचा खेळ बघताना कट्टर फुटबॉलप्रेमींची पापणीही लवत नाही. चपळता, चलाखी, पदलालित्य, पासिंग, हेडर, कॉर्नर, किक या सगळ्यातच हे लोक 'बाप' आहेत. पण हे कौशल्य अंगी बाणवण्यासाठी त्यांनी वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षीपासून जिद्दीनं, चिकाटीनं परिश्रम केलेले असतात.
या स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं. हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचा मेसेजही फिरतोय, पण त्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. पण, 'मेकिंग ऑफ स्टार फुटबॉलर' म्हणून या व्हिडिओकडे नक्की बघता येईल.