कोल्हापूर : ‘फुटबॉलपटूंना राज्यशासनाकडून किक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयातर्फे ‘फुटबॉल’मधून शासन निर्णयानुसार निकषास पात्र ठरणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना शिवछत्रपती पुरस्कारासाठी निवड केली जाते, अशी माहिती क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी पत्रकाद्वारे दिली.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडापटू, संघटक-कार्यकर्ते व फुटबॉल खेळाशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी या क्षेत्रासाठी आपले सर्वस्व पणाला लावून जीवनक्रीडा विकासासाठी व्यतीत केले. अशा व्यक्तींना ‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्रदान केला जातो. यात १६ आॅक्टोबर २०१७ शासन शुद्धीपत्रकाद्वारे ३९ खेळांचा पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला.
यात नियमावलीमध्ये ३० जून रोजी संपणाऱ्या लगतपूर्व पाच वर्षांतील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कामगिरीचा विचार केला जातो, तर यापूर्वी फुटबॉलमधून चार नव्हे, तर सात पुरूष व १0 महिलांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी दर्जेदार खेळाडूंची निवड व्हावी. फुटबॉल खेळामधील व्यक्तींचे संघटनात्मक कार्य भरीव असावे व क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय असावे, अशा व्यक्तींचा आॅनलाईन अर्ज प्राप्त झालेला असेल, तर गुणांकनासाठी विचार व निवड केली जाते. फुटबॉलसाठी निकष बदलण्यासंबंधी निवड समिती निर्णय घेते. यात निकष शिथील करण्यासंबंधी जाणकार बदल सुचवू शकतात. असेही सहसंचालक सोपल यांनी स्पष्ट केले.नियमावली अशी,पाच वर्षांपैकी कोणत्याही तीन वर्षांत संबंधित खेळाडूने अधिकृत राज्य संघातर्फे संबंधित खेळाच्या अधिकृत राष्ट्रीय फेडरेशनमार्फत आयोजित वरिष्ठ (सिनीअर), राष्ट्रीय स्तर/ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (नॅशनल गेम्स)मध्ये महाराष्ट्रातर्फे प्रातिनिधीक संघातून सहभागी होऊन किमान एका वर्षात पदक (प्रावीण्य) संपादित केले आहे. अशा खेळाडूंच्या गुणांकनाकरिता विचार केला जातो.
फुटबॉल खेळासाठी सुधारित नियमावलीमध्ये संतोष ट्रॉफी, फेडरेशन कप, बी. सी. रॉय चषक अशा नवीन स्पर्धांचा गुणांकनामध्ये समावेश केला आहे. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकास नऊ गुण, द्वितीय क्रमांकास आठ गुण, तृतीय क्रमांकास सात गुण व सहभागासाठी सहा गुण ठेवण्यात आले आहेत.