कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. सीरि ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत. युरोपमधील विविध क्लबच्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोना लागण झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. त्यात स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियानं त्यांच्या क्लबमधील ३५ टक्के साहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली.
आतापर्यंत स्पेनमध्ये ८७४४ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यापैकी २९७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. व्हॅलेंसिया क्लबनं जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,'' क्लबच्या प्रशिक्षक स्टाफ आणि खेळाडूंच्या काही चाचणी करण्यात आल्या आणि त्या पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही सर्वांना ही विनंती करतो की घरीच राहा आणि जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या सूचनांचे पालन करा.''
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या २१ व्या वर्षी प्राण गमवावे लागले. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत तो २०१६ पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याच्या शरिरात कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
गार्सियाच्या निधनावर क्लबचे अध्यक्ष पेपे ब्युएनो म्हणाले,''फ्रान्सिस्को हा प्रतिभावान प्रशिक्षक होता. आमच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता मला हॉस्पिटलमधूल सांगण्यात आले की फ्रान्सिस्कोची प्रकृती सुधारत आहे, पण तासाभरात त्याच्या जाण्याची बातमी कळली.''