कोच्ची : एकतर्फी झालेल्या सामन्यात संभाव्य विजेत्या ब्राझीलने आपल्या लौकिकानुसार सहज बाजी मारताना होंडुरासचा ३-० असा धुव्वा उडवून १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ब्रेनर याने दोन गोल नोंदवून ब्राझीलच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आता रविवारी कोलकाता येथे ब्राझीलचा सामना तगड्या जर्मनीविरुद्ध होईल. दोन्ही संघ संभाव्य विजेते मानले जात असल्याने हा सामना हायव्होल्टेज असेल.येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच ब्राझीलने चेंडूवर अधिकवेळ नियंत्रण राखले. ११व्या मिनिटालाच ब्रेनरने होंडुरासच्या क्षेत्रात मुसंडी मारत वेगवान गोल करून ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. या वेगवान गोलमुळे दडपणाखाली आलेल्या होंडुरासकडून अनेक चुका झाल्या आणि त्याचा फायदा घेत ४४व्या मिनिटाला मार्कस अँटोनिओने गोल करुन मध्यंतराला ब्राझीलची आघाडी २-० अशी भक्कम केली.दोन गोलच्या पिछाडिमुळे बचावात्मक पवित्रा घेतलेल्या होंडुरासवर ब्राझीलने आणखी हल्ले केले. ५६व्या मिनिटाला पुन्हा एकदा ब्रेनरने मिळालेल्या संधीचा फायदा घेत अप्रतिम गोल करुन ब्राझीलची आघाडी ३-० अशी केली. स्पर्धेतील ब्रेनरचा हा तिसरा गोल ठरला. यानंतर होंडुरासने गोल करण्याचा थोडाफार प्रतिकार केला, परंतु ब्राझीलचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही.
बलाढ्य ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत, होंडुरासचा 3-0 असा उडवला धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 01:06 IST