मुंबई : येथे झालेल्या महिलांच्या १७ वर्षाखालील तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्वीडनने भारताला ४-० असे पराभूत केले. यासह स्वीडनने अपेक्षेप्रमाणे खेळ करत विजेतेपद पटकावले.सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला स्वीडनच्या रुसुल काफजीने गोल करत भारतावर दबाव आणला. त्यानंतर कर्णधार इल्मा नेहवालने १६ व्या मिनिटाला गोल केला. रुसुलने दिलेल्या कॉर्नर किकवर हेडरद्वारे गोल करत इल्माने स्वीडनला २-० अशी आघाडी मिळवून दिली.त्यानंतर लगेचच १८ व्या मिनिटाला इवेलिना दुलजान हिने गोल करत स्वीडनला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हीच आघाडी कायम होती. सामन्याच्या ६१ व्या मिनिटाला स्वीडनला पेनल्टी मिळाली. मात्र मायिल्डा विनबर्गने मारलेली किक क्रॉस बारच्या वरुन बाहेर गेली. मात्र याची भरपाई मोनिकाने करताना स्वीडनकडून चौथा गोल नोंदवला. स्वीडनने सामना संपेपर्यंत हीच आघाडी कायम राखत बाजी मारली. भारतीय मुलींना पाठिंबा देण्यासाठी अंधेरी क्रीडा संकुलात मोठ्या संख्येने चाहत्यांनी उपस्थिती लावली. ‘चक दे इंडिया’ आणि ‘इंडिया.. इंडिया..’ असा गजर करत चाहत्यांनी भारतीय संघाचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
बलाढ्य स्वीडनने पटकावले विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 4:53 AM