मेलबर्न : स्वीडनने महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या अमेरिकेवर पेनल्टी शूटआउटमध्ये ५-४ अशी मात करत धक्कादायक निकाल नोंदवला.
महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या अमेरिकेची ही सर्वांत खराब कामगिरी ठरली. अमेरिकेला प्रथमच उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले.
निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र, दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. या विश्वचषक स्पर्धेत अतिरिक्त वेळेपर्यंत गेलेला हा पहिलाच सामना ठरला. स्वीडनने याआधी २०१६ च्या ऑलिम्पिक उपांत्यपूर्व फेरीतही पेनल्टी शूटआउटमध्ये अमेरिकेला पराभूत केले होते. पेनल्टीमध्ये दोन्ही संघ ४-४ असे बरोबरीवर होते. अमेरिकेची कॅली ओहारा शेवटच्या प्रयत्नावर गोल करण्यात अपयशी ठरली, तर लीना हर्टिंगने गोल करत स्वीडनला उपांत्यपूर्व फेरीत नेले. अमेरिकेची गोलरक्षक नैहरने हर्टिंगचा गोल रोखल्याचा दावा केला. मात्र, पंचांनी चेंडू रेषेच्या आत असल्याचे सांगताच स्वीडनच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला.
नेदरलँडची आगेकूच n नेदरलँडने रविवारी दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव करत विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. n उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडचा सामना स्पेनशी होणार आहे.