दोहा : गत उपविजेता क्रोएशिया संघाने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत शनिवारी मोरोक्कोचा २-१ असा पराभव करीत फिफा विश्वचषकात एक पायरी खाली येत तिसऱ्या स्थानावर समाधान मानले. सुरुवातीच्या नऊ मिनिटात दोन गोल झाले. मोरोक्को संघाला अखेरच्या टप्प्यात गोल नोंदविण्यात अपयश आल्यामुळे त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सातव्या मिनिटाला क्रोएशियाकडून २० वर्षांचा युवा जोस्को ग्वार्दियोलने हेडरद्वारे गोल नोंदवून क्रोएशियाचे खाते उघडले. मोरोक्कोने नवव्या मिनिटाला प्रत्युत्तर देत बरोबरी साधली. अशरफ दारी यानेदेखील हेडरवर गोल नोंदविला. मध्यांतराला तीन मिनिटे शिल्लक असताना क्रोएशियाकडून लिवाजाने दिलेल्या पासवर मिस्लॉव ओरसिचने गोल नोंदवून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली व अखेरपर्यंत कायम राखली.
मोरोक्कोने यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत उपांत्यपर्यंत धडक मारली होती. विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को हा आफ्रिका खंडातील पहिला देश ठरला होता. त्यांना आज सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. मात्र क्रोएशियाने त्यांचे स्वप्न तोडले. फ्रान्सने मोरोक्कोचा उपांत्य लढतीत २-१ असा पराभव केला. तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला होता. क्रोएशिया आणि ‘जायंट किलर’अशी ख्याती मिळविलेल्या मोरोक्को यांच्यातील साखळी सामना गोलशून्यने बरोबरीत सुटला होता. विश्वक्रमवारीत १२ व्या स्थानी असलेला लुका मॉड्रिचा संघ आणि २२ व्यास्थानावर असलेल्या मोरोक्कोच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाने सुरुवात केली. क्रोएशियाने मध्यांतरापर्यंत ज्या सामन्यात आघाडी संपादन केली, तो सामना जिंकल्याचा इतिहास आहे.