मुंबई : येथे सुरू असलेल्या आंतररराष्ट्रीय तिरंगी फुटबॉल मालिकेत सलामीला यजमान भारतीय संघाविरुद्ध पराभवाचा सामना झाल्यानंतर मॉरिशस संघ मंगळवारी सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध भिडेल. विशेष म्हणजे फिफा क्रमवारीत १६० व्या स्थानी असलेल्या मॉरिशसला ९७ व्या स्थानावरील भारताविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर पुन्हा त्यांना आपल्याहून सरस क्रमवारी असलेल्या संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे.अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर होणाºया या सामन्यासाठी मॉरिशस संघ पूर्णपणे सज्ज आहे. तसेच, मॉरिशसचे प्रशिक्षक फ्रान्सिस्को फिल्हो यांनी आम्ही भारताविरुद्ध केलेल्या आक्रमक खेळाप्रमाणेच मंगळवारीही आक्रमक पवित्रा घेऊन खेळू, असे म्हटले. मॉरिशसने शनिवारी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात १५ व्या मिनिटालाच गोल केला.फिफा क्रमवारीत १६० व्या स्थानी असलेल्या मॉरिशसला आक्रमक खेळ करण्यासोबतंच सेंट किट्स आणि नेविस संघाला वर्चस्व मिळवण्याची संधी न देण्याबाबतही प्रयत्न करावे लागेल. भारताविरुद्ध मॉरिशसची बचाव फळी कमजोर ठरली होती. हिच बाजू मजबूत करण्याचे आव्हान कर्णधार केविन ब्रूपुढे असेल.दुसरीकडे, फिफा क्रमवारीत १२५ व्या स्थानी असलेल्या सेंट किट्स आणि नेविस संघ मॉरिशसनंतर २४ आॅगस्टला भारताविरुद्ध भिडेल. मात्र, या सामन्याआधी मॉरिशसला नमवून आपल्या मोहिमेची यशस्वी सुरुवात करण्याचा निर्धार सेंट किट्स आणि नेविसचा असेल. प्रशिक्षक पास्सी जॅक्सच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या सेंट किट्स आणि नेविसने आपल्या अखेरच्या सामन्यात बार्बाडोसला २-१ असे नमवले होते.
तिरंगी फुटबॉल मालिका : मॉरिशसपुढे विजय मिळवण्याचे आव्हान, आज मुंबईत सेंट किंट्स आणि नेविसविरुद्ध खेळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 5:30 AM