मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील क्रिकेट सामना पुढील दोन तासांत सुरू होणार आहे. मात्र, त्या लढतीपूर्वी भारताच्या मुलींनी पाकिस्तान संघाला इंगा दाखवला आहे. एएफसी 16 वर्षांखालील महिला चॅम्पियन्सशीप पात्रता फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाने 4-0 अशा फरकाने पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला. सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघ ( 6 गुण) ब गटात अव्वल स्थानावर आहे. ब गटातील लढतीत भारतीय मुलींनी सुरूवातीलाच सामन्यावर पकड घेतली होती. 22व्या मिनिटाला अविका सिंगने भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यात पाकिस्तानच्या आयेशाने स्वयंगोल करत (41 मि.) भर घातली. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानकडून चुरशीचा खेळ झाला, परंतु भारतीय संघाने आघाडी कायम राखली होती. शेवटच्या दहा मिनिटांत भारतीय खेळाडूंनी आणखी दोन गोलची भर घातली. सुनिता मुंडा ( 82 मि.) आणि शिल्की देवी ( 88 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.भारताने पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा 6-1 असा धुव्वा उडवला होता. या लढतीत कोमने तीन गोल केले होते, तर देवीने दोन आणि मुंडाने एक गोल केला होता. '' पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आम्हाला आणखी गोलची अपेक्षा होती, परंतु या निकालावरही आम्ही समाधानी आहोत. आम्हाला मंगोलिया व लाओस संघांचा सामना करायचा आहे. त्यात विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे,''असे अविका सिंगने सांगितले.