रोहित नाईकनवी मुंबई : रोमांचक झालेल्या आफ्रिकन देशांच्या लढतीमध्ये दोन वेळच्या चॅम्पियन घानाने अपेक्षित बाजी मारताना नवख्या नायजेरचा २-० असा पराभव करत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. यासह पहिल्यांदाच युवा फिफा विश्वचषकात खेळत असलेल्या नायजेरचा चमकदार प्रवास थांबला. तसेच, नायजेरचे कडवी झुंज देताना आपल्याहून खूप सरस असलेल्या घानाला विजयासाठी घाम गाळायला लावला. उपांत्यपूर्व फेरीत घाना शनिवारी गुवाहाटी येथे झुंजार मालीच्या रुपाने पुन्हा एकदा आफ्रिकन आव्हानाला सामोरे जाईल.नेरुळ येथील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी मोठ्या संख्येने फुटबॉलप्रेमींनी उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे घानाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचा चाहतावर्गही स्टेडीयममध्ये उपस्थित होता. मात्र, आपल्या दमदार व झुंजार खेळाच्या जोरावर नवख्या नायजेरने सर्वांचीच मने जिंकली. वेगवान खेळाचा अभाव आणि अनुभवाची कमतरता यामुळे नायजेरची झुंज अखेर अपयशी ठरली.कर्णधार एरिक एयीयाह याने मध्यंतरापुर्वीच्या अतिरिक्त वेळेत पेनल्टी किकवर केलेला गोल आणि ९०व्या मिनिटाला रिचर्ड डॅनसो याने केलेला अप्रतिम गोल याजोरावर घानाने नायजेरचे कडवे आव्हान २-० असे परतावले. घानाने या सामन्यात चेंडूवर ६७% वर्चस्व गाजवले. तसेच, आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना घानाने संपूर्ण सामन्यात नायजेरच्या गोलजाळ्यावर ७ हल्ले केले. परंतु, त्यापैकी केवळ २ हल्ले यशस्वी ठरले. नायजेरचा गोलरक्षक खालेद लवाली याने जबरदस्त बचाव करताना घानाचे ५ आक्रमण यशस्वीरीत्या रोखले.पहिल्या सत्रात घानाच्या आक्रमक खेळाला नायजेरचे आपल्या भक्क्म बचावाच्या जोरावर जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, नायजेरनेही गोल करण्याच्या काही संधी निर्माण केल्या, परंतु अनुभवाची कमतरता त्यांच्या खेळात स्पष्ट दिसून आली. मध्यंतराला गोलशून्य बरोबरी राहणार असे दिसत असतानाच मिळालेली पेनल्टी किक सत्कारणी लावत कर्णधार एरिकने घानाला आघाडीवर नेले. दुसºया सत्रातही नायजेरने चांगली झुंज दिली. तसेच, ८६व्या मिनिटाला पुन्हा एकदा घानाला पेनल्टी किक मिळाली. परंतु यावेळी एरिकची किक लवालीने अप्रतिमरित्या अडवली. परंतु, अखेरच्या मिनिटाला बदली खेळाडू रिचर्डने गोलक्षेत्राच्या बाहेरुन जबरदस्त गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
U17 fifa world cup- घानाने नवख्या नायजेरला २-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 7:10 PM