माद्रिद : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इंग्लंड संघाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. UEFA Nations League मध्ये इंग्लंडने चुरशीच्या सामन्यात माजी विश्वविजेत्या स्पेनला त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-२ अशी पराभवाची चव चाखवली. या विजयाबरोबर इंग्लंड संघाने अनेक विक्रमही मोडले. रहिम स्टेर्लींगचे दोन गोल आणि मार्कस रेशफोर्डच्या एका गोलच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या सत्रातच ३-० अशी आघाडी घेतली होती. संघाचा प्रमुख खेळाडू आणि कर्णधार हॅरी केन याला गोल करण्यात अपयश आले असले तरी त्याने गोलसाठी साहाय्य केले. स्पेनने दुसऱ्या सत्रात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पॅको ॲल्सेसर आणि सर्गिओ रामोस यांनी प्रत्येकी एक गोल केला. पण स्पेनचा पराभव टाळण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे ठरले नाही. या विजयानंतर इंग्लंडने नोंदवलेले विक्रम - या सामन्यापूर्वी स्पेनला स्पर्धात्मक सामन्यात कधीच तीन गोलने पराभव पत्करावा लागला नाही. - इंग्लंडने ३० वर्षांत प्रथमच स्पेनला नमवण्याचा पराक्रम केला. याआधी १९८७ मध्ये गॅरी लिनकेरच्या चार गोलच्या जोरावर इंग्लंडने ४-२ असा विजय मिळवला होता. - स्पेनला त्यांच्याच भूमीवर २००३ नंतर पराभूत करणारे साउथगेट हे इंग्लंडचे पहिलेच प्रशिक्षक ठरले.