नवी दिल्ली : जगभरातील गुणवान युवा फुटबॉलपटूंनी भारतात पहिल्यांदाच पार पडलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले. इंग्लंड संघाने जबरदस्त खेळ करताना पिछाडीवरुन बाजी मारताना स्पेनच्या हातून विश्वचषक हिसकावून घेतला. दरम्यान, देशातील सहा शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेतील विविध सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीसह स्पर्धेत नोंदवलेल्या गोलच्या बाबतीतही यजमान म्हणून भारताने विश्वविक्रम नोंदवले.चौथ्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लंड संघाने आपल्या स्टार खेळाडूंच्या जोरावर पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक पटकावण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेपैकी हा अंतिम सामना सर्वात रोमांचक झाल्याचे मत अनेक फुटबॉलप्रेमींनी व्यक्त केले.या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच युरोपियन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. विशेष म्हणजे इंग्लंडने या जेतेपदासह यंदाच्या वर्षी झालेल्या 17 वर्षांखालील युरो चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपाही काढला. १७ वर्षांखालील युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत इंग्लंडला नमवले होते. त्याचप्रमाणे, यंदाच्या वर्षी सुरुवातीला कोरियामध्ये झालेल्या २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही इंग्लंडने चषक उंचावला होते. दुसरीकडे, स्पेनला चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. याआधी स्पेनने १९९१, २००३ आणि २००७ साली उपविजेतेपद पटकावले होते. यंदा त्यांना विश्वविजेते बनण्याची संधी होती, परंतु तुफान फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडने त्यांचे स्वप्न धुळिस मिळवले. इंग्लंडच्या फॉर्मपुढे बलाढ्य आणि संभाव्य ब्राझीललाही उपांत्य फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला होता. परंतु, त्यांनी तिसºया स्थानाच्या लढतीत झुंजार मालीचा पराभव करुन कांस्य पदक पटकावले. (वृत्तसंस्था)भारतीय संघ या स्पर्धेत भलेही पदक मिळवण्यापासून दूर राहिला असेल, पण युवा भारतीय खेळाडूंनी अनेकांची मने जिंकली आहेत. विश्वविजेते ठरलेल्या इंग्लंडचे मनापासून अभिनंदन. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांनी शानदार खेळ केला. यजमान म्हणून भारताने युवा विश्वचषकाचे शानदार आणि यशस्वी आयोजन केले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमान म्हणून भारताने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानसंघातील कोणताही खेळाडू या यशाने हुरळून जाणार नाही. आमच्याकडून आता अधिक अपेक्षा केल्या जातील, कारण आम्ही दोन विश्वचषक पटकावले आहेत. आम्ही आमच्या योजनेनुसार खेळत राहणार व नेहमी सकारात्मकतेने पुढे जाणार. आमचे पुढील लक्ष्य निश्चित वरिष्ठ स्तरावरील विश्वचषक व युरो चषक जिंकण्याचे आहे.- स्टीव्ह कूपर,प्रशिक्षक, इंग्लंडमला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. आम्ही गेल्या तीन वर्षांमध्ये खूप चमकदार कामगिरी केली आहे. आम्ही येथे नक्कीच उपविजेते आहोत, पण आम्ही युरो चॅम्पियन आहोत. खेळाडूंच्या कामगिरीवर मला गर्व आहे.- सँटीयागो डेनिया,प्रशिक्षक, स्पेन
१७ वर्षांखालील फुटबॉल : फिफा विश्वचषक स्पर्धा शानदार ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:36 AM