पणजी, दि. 9 - भारतात पहिल्यांदाच होणा-या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील गोव्यातील सामन्यांच्या आॅनलाईन तिकीट विक्रीला अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याने येथे मैदानावर ‘बॉक्स आॅफीस’ द्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. पण त्यालाही पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दोन दिवसांत ५५० तिकिटांची विक्री झाली असून ही टक्केवारी एकूण तिकिटांच्या १० टक्के अशी आहे.गोव्यातील पहिला सामना ७ आक्टोबर रोजी जर्मनी व कोस्टारिका यांच्यात होईल.
त्यानंतर १०, १३, १७ आक्टोबर रोजी सामने होतील. माहितीनुसार, सर्व सामन्यांची एकूण ६० हजारपर्यंत तिकिटे आहेत. यापैकी ३० ते ४० टक्क्यांची विक्री आॅनलाइन पध्दतीने होणार आहे. आॅनलाइन तिकीट विक्रीस प्रतिसाद न मिळाल्याने खिडकी पद्धतीने तिकीट विक्री सुरू करण्यात आली. तिकीट विक्री वाढावी म्हणून ५ आॅक्टोबरपर्यंत खरेदी करणा-याला २५ टक्के सूट देण्याचा उपक्रमही राबविण्यत येत आहे. देशात इतर ठिकाणी आॅनलाईन तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. गोव्यात मात्र पाहिजे तसे यश मिळाले नाही.अल्प प्रतिसादामुळे चिंता सकाळी १० वाजता तिकीट विक्रीला सुरुवात केली जाते.
शुक्रवारी सुद्धा मोजक्याच फुटबॉलप्रेमींच्या रांगा होत्या. दक्षिण व उत्तर स्टँडसाठी १५० रुपये व पूर्व स्टँडसाठी ३०० रुपये असे तिकिटाचे दर आहेत. दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात फुटबॉलचे शौकीन जास्त प्रमाणात असले तरी आजच्या दिवशी काणकोण व सांगे तालुक्यातील फुटबॉलप्रेमींनी तिकिटे खरेदी करण्यासाठी उपस्थिती लावली होती. या वेळी सांगे येथून आलेले सतीश वेळीप म्हणाले की, वरिष्ठ संघांच्या खेळाडूंचा सामना पाहण्याची संधी लाभणार की नाही याची शाश्वती नाही. मात्र, युवा खेळाडूंचे सामने पाहण्याची संधी मिळत आहे. तिकीट मिळवण्यासाठी मात्र कोणताही त्रास झाला नाही. सहज उपलब्ध होत आहेत.