पॅरिस - फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू जीन पियरे अॅडम्स यांचे आज निधन झाले. (Jean-Pierre Adams)ते ७३ वर्षांचे होते. गेल्या तब्बल ३९ वर्षांपासून ते कोमामध्ये होते. १९८३ मध्ये त्यांना गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी भुल देण्यात आली होती. मात्र या औषधाने त्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करून टाकले. तेव्हा कोमामध्ये (Coma)गेलेले जीन पियरे अॅडम्स पुन्हा उठलेच नाही. याच अवस्थेत अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
आफ्रिका खंडातील सेनेगल येथे जन्मलेले अॅडम्स हे बचावपटूच्या पोझिशनमध्ये खेळत असत. त्यांनी नीस ऐणि पॅरिस सेंट जर्मन यासारख्या प्रसिद्ध क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच १९७२ ते १९७६ या काळात त्यांनी २२ सामन्यांमध्ये फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले. तसेच पॅरिस सेंट जर्मन संघाकडून ते ४१ सामने खेळले होते. नीस क्लबसाठी त्यांनी सर्वाधिक १४० सामने खेळले होते. त्यांना श्रद्धांजली वाहताना क्लबकडून सांगण्यात आले की, १९ सप्टेंबर रोजी मोनॅकोविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी क्लब अॅडम्स यांचे स्मरण करणार आहे.
१९८२ मध्ये गुडघ्यावरील नियमित शस्त्रक्रियेसाठी त्यांना भुल देण्यात आली. मात्र त्यावेळी बेशुद्धावस्थेत गेलेले जीन पियरे अॅडम्स पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. तेव्हापासून त्यांची पत्नी बर्नाडेट त्यांची देखभाल करत होती. दरम्यान, निम्स युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये जीन पियरे अॅडम्स यांना आज मृत घोषित करण्यात आले.