Euro 2020 स्पर्धेतील ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघ यांचा प्रवास उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. सर्वाधिक पाचवेळा युरोपियन स्पर्धा खेळणाऱ्या रोनाल्डो यापुढे या स्पर्धेत खेळेल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळेच बेल्जियमविरुद्धचा पराभव पोर्तुगालच्या इतर सदस्यांपेक्षा रोनाल्डोच्या अधिक जिव्हारी लागला. गोल करण्याचे सातत्यानं प्रयत्न करूनही पोर्तुगालला अखेरपर्यंत ०-१ अशी पिछाडी भरून काढता आली नाही आणि बेल्जियमनं थोर्गन हझार्डनं ४३व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बेल्जियमनं गतविजेत्यांना स्पर्धेबाहेर करून Euro 2020तील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद केली. या पराभवानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रचंड निराश दिसला. तो भावनिकही झालेला पाहायला मिळाला, परंतु त्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण राखता आले नाही आणि त्यानं रागात स्वतःच्याच देशाचा अपमान होईल असे कृत्य केले. ड्रेसिंग रुममध्ये जात असताना रोनाल्डोनं कर्णधारासाठीचा आर्मबँड मैदानावर फेकला अन् त्यानंतर तो लाथेनं तुडवलाही. त्याच्या या कृतीची निंदा केली जात आहे. सोशल मीडियावर रोनाल्डोचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३६ वर्षीय रोनाल्डोनं सर्वाधिक १०९ आंतरराष्ट्रीय गोल्सच्या अली दार यांच्या विक्रमाशी बरोबरी याच स्पर्धेत केली. शिवाय युरो स्पर्धेत सर्वाधिक १२ गोल्स करणाऱ्या खेळाडूचा मानही त्यानं पटकावला. पण, आता पोर्तुगाल व रोनाल्डोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रोनोल्डोला फ्री किकवर गोल करण्याची संधी होती, परंतु त्याला अपयश आलं. ''हा निकाल दुर्दैवी आहे, परंतु त्यांनी गोल केला आणि आम्ही ते करू शकलो नाही,''अशी प्रतिक्रिया पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांनी दिली. दरम्यान, प्रमुख खेळाडू केव्हिन डी ब्रूयने आणि इडन हझार्ड यांच्या दुखापतीनं बेल्जियमची चिंता वाढवली आहे.