नवी दिल्ली : १७ वर्षांखालील विश्वकप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होताना सर्व भारतीय खेळाडूंमध्ये उत्सुकता होती, पण अनुभवाची उणीव स्पष्ट दिसून आली. भारताने फिफाच्या स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधित्व केले.यजमान संघाचे गट साखळीतच आव्हान संपुष्टात आले. भारताने सर्व तिन्ही सामने गमावले असले तरी, त्यांनी कोलंबियाला कडवे आव्हान दिले. पण या सामन्यातही १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या व्यतिरिक्त भारताला अमेरिकेविरुद्ध ०-३ ने तर घानाविरुद्ध ०-४ ने पराभवाला सामोरे जावे लागले.कर्णधार अमरजित सिंग म्हणाला, ‘अनुभव चांगला होता. आम्ही जगातील अव्वल संघांविरुद्ध खेळत होतो. घाना संघ तर दोनदा जेतेपद पटकावणारा आहे. आम्हाला त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. संघाच्या बैठकीमध्ये आम्ही १०० टक्केच नाही तर २०० टक्के योगदान देऊ, असा विश्वास व्यक्त केला होता. आम्ही विजयासाठी प्रयत्नशील होतो, कारण आम्हाला चाहत्यांचा पाठिंबा होता, पण आमच्याकडे अनुभवाची शिदोरी नव्हती.’अमरजित पुढे म्हणाला,‘आम्ही १० वर्षांचे झाल्यानंतर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, पण अन्य संघाचे खेळाडू वयाच्या सहाव्या वर्षांपासून खेळण्यास सुरुवात करतात. त्याचा मोठा फरक पडतो. आता एआयएफएफ यावर लक्ष केंद्रित करीत आहे. एआयएफएफच्या अनेक योजना असून भारत भविष्यातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करेल, असे मला वाटते.’अमरजित म्हणाला, ‘घानाविरुद्धच्या लढतीच्या शेवटी आम्ही थोडे थकलेले होतो. कारण या सामन्याआधी दोन कडव्या लढती खेळलो होतो. काही खेळाडू दुखापतग्रस्त होते तर काहींना स्नायूच्या दुखापतींचा त्रास जाणवत होता.’ (वृत्तसंस्था)
विश्वकप स्पर्धेतून बरेच काही शिकलो, भारतीय खेळाडूंची प्रतिक्रिया : जगातील अव्वल संघांविरुद्ध खेळलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:25 AM