Durand Cup Final 2022 : भारतात क्रिकेट सोडून अन्य खेळांचा विकास व्हावा असे अनेकांना 'फक्त' वाटतं... राजकिय इच्छाशक्तींच्या अभावामुळे भारतीय फुटबॉल बराच मागे आहे... जागतिक फुटबॉल महासंघ ( FIFA) ने राजकिय हस्तक्षेपामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर ( AIFF) निलंबनाची कारवाई केली होती आणि नंतर ती मागेही घेतली. त्यात आता भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री ( Sunil Chhetri) याचा अपमान करणारी घटना घडली आहे. डुरांड चषक २०२२ ( Durand Cup 2022 ) ही मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर विजयी चषक देताना फक्त फोटोसाठी बंगालचे राज्यपाल ला गणेसन ( West Bengal Governor La Ganesan ) यांनी छेत्रीला ढकलल्याचे चित्र दिसले.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या स्टार खेळाडूंना सुनील छेत्री ८४ गोल्ससह टक्कर देतोय. डुरांड चषक स्पर्धेत बंगलोर एफसीने जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बंगलोर एफसीने २-१ अशा फरकाने मुंबई सिटीचा पराभव केला. जेतेपदाचा चषक स्वीकारण्यासाठी जेव्हा सुनील छेत्री व्यासपीठावर गेला तेव्हा ला गणेसन यांच्याहस्ते विजयी चषक देण्यात आला, परंतु फोटोसाठी गणेसन यांनी छेत्रीचा अपमान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी फुटबॉलप्रेमी करत आहेत.